IPL 2020: रिक्त स्टेडियममध्ये खेळण्यासह यावर्षी आयपीएल आयोजित करण्याबाबत सर्व संभाव्य पर्यायांचा शोध घेत आहोत, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे मोठे विधान
गांगुलीने बुधवारी सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पत्र लिहून म्हटले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) रिक्त स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) आयोजन करण्यास सज्ज आहे आणि यावर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांवर काम करत आहे. बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) बुधवारी सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पत्र लिहून म्हटले. गांगुलीने एका पत्रात लिहिले आहे की, "बीसीसीआय यावर्षी आयपीएलचे आयोजन करण्यास सक्षम आहे, जरी रिकाम्या स्टेडियममध्ये स्पर्धा खेळवायचं असलं तरीही, हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांवर कार्य करीत आहे. प्रेक्षक, फ्रँचायझी, खेळाडू, प्रसारक, प्रायोजक आणि इतर सर्व भागधारक यावर्षी आयपीएलचे आयोजन करण्याची शक्यता पाहत आहेत." कोविड-19 (COVID-19) कारणाने यंदा लीग अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. गांगुली यांनी आयपीएलपासून देशांतर्गत सत्र पुन्हा सुरू करण्यापर्यंत मंडळाच्या कामकाजाविषयी राज्य संघटनांना पत्र लिहिले. (IPL 2020 भारताबाहेर खेळवण्यासाठी BCCI सज्ज, बोर्ड अधिकाऱ्याने दिली मोठी माहिती)
“बीसीसीआय सर्व राज्य क्रिकेट संघटनांसाठी कोविड-19 स्टँडर्ड ऑपरेशन प्रक्रिया (एसओपी) विकसित करण्याच्या विचारात आहे. मूलत: हे एसओपी आमच्या सदस्यांना एक मानक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून बनविली जात आहे जे संघटनांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात क्रिकेट पुन्हा सुरू करण्यास मदत करेल," गांगुली यांनी सर्व संलग्न सदस्यांना आपल्या पत्रात लिहिले. आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्च रोजी सुरू होणार होता, मात्र ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
दरम्यान, आयपीएलमध्ये भाग घेणार्या भारत आणि इतर देशांतील अनेक खेळाडूंनीही यंदा स्पर्धेत भाग घेण्याची उत्सुकता दर्शविली आहे. दुसरीकडे, मार्चपासून ठप्प झालेल्या क्रीडा स्पर्धा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज टीममध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.