IPL 2020 Update: 16 ऑगस्टपासून एमएस धोनी अॅक्शनमध्ये दिसणार? आयपीएलपूर्वी चेपौक येथे प्रशिक्षण शिबिरासाठी CSKचे तामिळनाडू सरकारला पत्र
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान फ्रँचायझी सराव शिबिराचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तमिळनाडू सरकारला यापूर्वीच देण्यात आला आहे आणि सध्या फ्रँचायझीला लेखी मंजुरीची प्रतीक्षा आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रासाठी तयारी सुरू केली आहे. अलीकडेच एक वृत्त समोर आले होते की धोनी रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये (JSCA Stadium) गोलंदाजीच्या मशीनद्वारे फलंदाजीचा सराव करताना दिसला. पण, धोनी 16 ऑगस्टपासून चेपौक येथील प्रशिक्षण शिबिरादरम्यान पुन्हा एकदा अक्शनमध्ये दिसू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघ 16 ऑगस्टपासून सर्व खेळाडूंसाठी चेपौक येथे प्रशिक्षण शिबिर सुरू करण्याचा विचार करीत आहे. धोनी इनडोअर सराव करण्यासाठी रांची येथे दाखल झाला आणि आता वृत्तानुसार सीएसके चेपौक (Chepauk) येथे 15 सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करीत आहे. ESPNCricinfoच्या अहवालानुसार 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान फ्रँचायझी सराव शिबिराचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. (IPL 2020 in UAE: युएई येथे सर्व भारतीय खेळाडू अपयशी! 'या' फलंदाजाच्या नावावर आहेत सर्वाधिक धावा)
यासंबंधीचा प्रस्ताव तमिळनाडू सरकारला यापूर्वीच देण्यात आला आहे आणि सध्या फ्रँचायझीला लेखी मंजुरीची प्रतीक्षा आहे. सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथनने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, “आम्हाला 16 ते 20 ऑगस्टपर्यंत चेन्नईत शिबिर हवा आहे. आम्ही परवानगीसाठी तामिळनाडू सरकारकडे अर्ज केला आहे. तोंडी ते म्हणाले की होय, परंतु अद्याप आम्हाला मंजुरीचे लेखी पत्र मिळालेले नाही. जर लेखी मान्यता मिळाली तर आम्ही एकटेच भारतीय खेळाडूंसाठी कॅम्पचे नियोजन करीत आहोत.” शिबिर सुरू होण्यापूर्वी खेळाडूंची आपापल्या गावी कोविड-19 टेस्ट केली जाईल. त्यानंतर ते चेन्नईला येतील आणि 17 व 18 ऑगस्टला त्यांच्या आणखी दोन टेस्ट्स केल्या जातील.
चेन्नई तामिळनाडूमध्ये शिबिर न झाल्यास 21 ऑगस्ट रोजी खेळाडूंसह युएईसाठी रवाना होण्याचा विचार करत आहे. पण, जर तसे झाले तर थोडासा उशीर होऊ शकेल. आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या सेमीफायनल पराभवात धोनी अंतिम वेळा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकला होता. त्यानंतर तो फेब्रुवारी-मार्च दरम्यान सीएसकेच्या सराव सत्रात नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसला. आणि आता आयपीएलपूर्वी सीएसकेसाठी धोनी पुन्हा नेट्समध्ये दिसणार असल्येन फ्रॅंचायझी 'थाला'चे काही फोटो आणि व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर शेअर करण्याची अपेक्षा चाहत्यांना करता येईल.