IPL Auction 2025 Live

IPL 2020: 'मी घेतो या पराभवाची जबाबदारी', KXIP विरुद्ध लाजिरवाण्या अपयशानंतर RCB कर्णधार विराट कोहलीची कबुली

आरसीबीच्या या पराभवाची जबाबदारी आता कर्णधार विराट कोहलीने घेतली. कोहली म्हणाला,“पहिल्या 15 ओव्हरपर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण त्यानंतर जे काही झालं त्यामुळे आम्ही पराभूत झालो. सर्वांसमोर उभं राहून मला या पराभवाची जबाबदारी घ्यावीच लागेल.”

आरसीबी कर्णधार विराट कोहली (Photo Credit: PTI)

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) नुकत्याच संपुष्टात आलेल्या आयपीएल (IPL) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील मैदानात संघर्ष करताना दिसला. किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 97 धावांनी धुव्वा उडवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. पंजाबने दिलेल्या 207 धावांच्या प्रत्युत्तरात आरसीबीला (RCB) 109 धावांपर्यंतच मजल मारता आली. यामध्ये 31-वर्षीय विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना बॅटने फक्त एक धाव केली. इतकंच नाही तर फिल्डिंग दरम्यानही विराटने पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे (KL Rahul) सलग दोन कॅच सोडले. कोहलीच्या चुकीचा राहुलने फायदा उचलला आणि 69 चेंडूत 132 धावा करत आरसीबी गोलंदाजांना धुतलं. आरसीबीच्या या पराभवाची जबाबदारी आता कर्णधार विराटने घेतली. (KXIP vs RCB, IPL 2020: किंग्स इलेव्हनची 'बल्ले-बल्ले'! फिरकी गोलंदाजीसमोर RCB फलंदाजांचे लोटांगण, पंजाब 97 धावांनी विजयी)

आरसीबी बॅटने पंजाबला स्पर्धा देऊ शकलेच नाही. या परभावाबद्दल बोलताना कोहली म्हणाला,“पहिल्या 15 ओव्हरपर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण त्यानंतर जे काही झालं त्यामुळे आम्ही पराभूत झालो. सर्वांसमोर उभं राहून मला या पराभवाची जबाबदारी घ्यावीच लागेल. माझ्या चुकीमुळे आमचं आव्हान 35 ते 40 धावांनी वाढलं. आम्ही पंजाबला 180 पर्यंत रोखू शकलो असतो आणि मग आमच्या फलंदाजीच्या वेळी पहिल्या चेंडूपासूनच आमच्यावर दडपण वाढलं नसतं.”

दरम्यान, केएल राहुल आजच्या सामन्याचा हिरो ठरला. बेंगलोरविरुद्ध राहुलने विक्रमी शतक ठोकले आणि कर्णधार म्हणून स्पर्धेत सर्वाधिक धावांची नोंद केली. शिवाय, राहुलचे दोन कॅच सोडणे आरसीबीला चांगलेच महागात पडले. कोहलीने राहुलचा दोन वेळा सीमारेषेजवळ झेल सोडला. राहुलचा विराटने पहिला कॅच 83 धावांवर आणि दुसरा 89 धावांवर असताना सोडला अशाप्रकारे किंग्स इलेव्हन कर्णधाराला दोनदा जीवनदान मिळाले. राहुलचा दुसरा कॅच पहिल्या पेक्षा सोप्पा होता, पण विराटने ती संधी गमावली. टॉस जिंकून कोहलीने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला पण राहुलने तो चुकीचा ठरवला. मयंक अग्रवाल आणि राहुलने पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. अग्रवाल 26 धावा काढून बाद झाला. निकोलस पूरन 17 धावा करून माघारी परतला, तर ग्लेन मॅक्सवेलने 5 धावा केल्या.