India Beat Pakistan: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी रोमहर्षक विजय! शेवटच्या दोन षटकांत फिरला सामना

प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानसमोर 120 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या आहे. तर, पाकिस्तानकडून हरिस आणि नसीमने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहे.

IND vs PAK, 19th Match: टी-20 विश्वचषक 2024 चा 19 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात (IND vs PAK) खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा सहा धावांनी (IND Beat PAK) पराभव केला आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला संपूर्ण भारतीय संघ 19 षटकांत केवळ 119 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियासाठी ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 113 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 31 धावांची खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने टीम इंडियाकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.

विराट कोहली पहिल्यांदाच अपयशी ठरला

याआधी विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खूप धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 डावांमध्ये कोहलीने आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत. ज्या डावात त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही त्यातही तो 36 धावांवर नाबाद राहिला. पण 2024 च्या टी-20 विश्वचषकात तो केवळ 4 धावा करून बाद झाला होता. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची ही त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे.