IND vs WI 1st ODI: विराट कोहलीने 8 धावांत बाद होऊनही इतिहास रचला, घरच्या मैदानावर वनडे क्रिकेटमधील आपल्या नावे केला आणखी नवा विक्रम
माजी कर्णधाराने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 चेंडूत 8 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमधली 249 वी इनिंग खेळणाऱ्या कोहलीने घरच्या मैदानावर 96 व्या डावात 500 धावांचा टप्पा पार केला.
IND vs WI 1st ODI: भारतीय संघाचा (Indian Team) माजी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात केवळ चार चेंडू खेळून पॅव्हिलियनमध्ये परतला, पण त्याआधीच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम स्वतःमध्ये एक विश्वविक्रम आहे, कारण विराट कोहली आता हा कारनामा करणारा जगातील सर्वात वेगवान आणि फलंदाज बनला आहे, ज्याने त्याच्या मायदेशात 5000 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. आणि या प्रकारात त्याने माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) ओव्हरटेक केले. माजी कर्णधाराने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर झेलबाद होण्यापूर्वी सलग दोन चौकार खेचले. (IND vs WI 1st ODI: टीम इंडियाचा 1000 व्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर 6 विकेटने विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली)
एकदिवसीय क्रिकेटमधली 249 वी इनिंग खेळणाऱ्या कोहलीने घरच्या मैदानावर 96 व्या डावात 5000 धावांचा टप्पा पार केला. तेंडुलकरने 121 डावात हा टप्पा पार केला होता तर जॅक कॅलिसने 130 वेळा फलंदाजी करून 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा टप्पा गाठण्यासाठी 138 डाव खेळला. याशिवाय 100 पेक्षा कमी डावात हा टप्पा गाठणारा कोहली हा आतापर्यंतचा एकमेव फलंदाज आहे. दुसरीकडे, घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या एलिट यादीत विराट चौथ्या क्रमांकावर आहे. तेंडुलकरने आपल्या मायदेशात 6976 धावा केल्या तर पाँटिंगने ऑस्ट्रेलियात 5521 धावा केल्या. कॅलिसने Proteas राष्ट्रात 5186 धावा आणि कोहलीने आतापर्यंत भारतात 5002 धावा केल्या आहेत. कोहलीची कारकीर्द अजून लांब आहे आणि येत्या काही वर्षांत तो आणखी अनेक विक्रम करण्याची शक्यता आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी यजमान संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 84 धावा जोडल्या. मात्र रोहित बाद झाल्यावर नियमित अंतराने विकेट गमावल्या, पण अखेरीस सूर्यकुमार यादव आणि नवोदित दीपक हुडाने संयमाने फलंदाजी करून संघाला विजयीरेष ओलंडून देत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. आता मालिकेतील पुढील 2 एकदिवसीय सामने अहमदाबादमध्ये तर 3 टी-20 सामने कोलकातामध्ये होतील.