IND vs SL 1st T20I: भारताविरुद्ध श्रीलंका संघात ‘या’ घातक खेळाडूचे पुनरागमन, ‘रोहितसेने’ला त्यांच्याच भूमीत एकटाच पुरून उरेल

पहिला टी-20 सामना गुरुवारी लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला जाईल आणि त्या सामन्यात वानिंदू हसरंगा पाहुण्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होईल हे निश्चित दिसत आहे. हसरंगाने लय मिळवल्यास तो फिरकी गोलंदाजांना सहाय्य्क खेळपट्टीवर एकटाच विरोधी संघाला पुरून उरेल.

वनिंदू हसरंगा (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात टी-20 मालिकेचे काउंटडाउन सुरु झाले आहे. 24 फेब्रुवारी रोजी लखनऊच्या (Lucknow) एकाना स्टेडियम येथे पहिल्या टी-20 सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येतील. यापूर्वी यजमान टीम इंडियाला दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादवच्या रूपात दोन मोठे धक्के बसले आहेत, तर लंकन वाघांसाठी दिलासादायक बाब म्हणजे त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा (Wanindu Hasranga) आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंका संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेने दौऱ्याची सुरुवात करेल, त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. पहिला टी-20 सामना गुरुवारी लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला जाईल आणि त्या सामन्यात वानिंदू हसरंगा पाहुण्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होईल हे निश्चित दिसत आहे. (IND vs SL T20I 2022: दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेतून बाहेर, BCCI कडून बदली खेळाडूंची घोषणा नाही)

गेल्या वर्षी शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. तेव्हा हसरंग आपल्या फिरकी गोलंदाजीने विरोधी संघावर भारी पडला होता. शेवटच्या श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिका गमावल्यावर श्रीलंका संघाने टी-20 मालिका जिंकण्यात हसरंगाने गोलंदाजीने निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आता लंकन संघाला पुन्हा त्याच्याकडून झटपट क्रिकेटमध्ये तशाच कामगिरीची अपेक्षा असेल. विशेष म्हणजे हसरंगाने लय मिळवल्यास तो फिरकी गोलंदाजांना सहाय्य्क खेळपट्टीवर एकटाच विरोधी संघाला पुरून उरेल. लखनऊच्या एकाना स्टेडियमवरील खेळपट्टी देखील फिरकी गोलंदाजांना मदत करणारी असेल, त्यामुळे ‘रोहितसेने’ला आगामी टी-20 मालिकेत हसरंगाच्या फिरकीविरुद्ध सावधगिरीने फलंदाजी करणे गरजेचे आहे.

उल्लेखनीय आहे की हसरंगा ऑस्ट्रेलिया विरोधी नुकत्याच संपुष्टात आलेल्या पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दौऱ्यावर गेला होता आणि पहिल्या दोन सामन्यानंतर तिसऱ्या मॅचपूर्वी त्याची कोविड-19 चाचणी सकारात्मक आढळली आणि त्याला उर्वरित सामन्यातून बाहेर पडणे भाग पडले. तथापि, आता त्याचा कोविड अहवाल नकारात्मक आला असून 24 फेब्रुवारी रोजी पहिल्या टी-20 सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. हसरंगा प्लेइंग इलेव्हनमध्ये परतल्यास कोणाला बाहेर केले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. डावखुरा फिरकीपटू प्रवीण जयविक्रमला वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.