IND vs SA 2022 Series: दक्षिण आफ्रिकेवर ‘हे’ 3 भारतीय धुरंधर पडतील भारी, करतात ताबडतोड फलंदाजी

या मालिकेत सर्वांचे लक्ष कर्णधार केएल राहुलकडे असेल. तर भारतीय ताफ्यात असे तीन फलंदाज आहेत, जे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ताबडतोड फलंदाजी करण्यात पटाईत आहेत. मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IND vs SA Series 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 सामन्यांची टी-20 आंतराराष्ट्रीय मालिका सुरु होणार आहे. टेंबा बावूमाच्या नेतृत्वातील पाहूणा संघ भारत दौऱ्यावर (South Africa Tour of India) पोहोचला आहे, तर भारतीय संघाने देखील 5 जूनपासून मालिकेची तयारी सुरु केली आहे. तब्ब्ल दोन महिन्यानंतर दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय मैदानात परतणार आहेत. अशा स्थितीत या मालिकेसाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ कटकमध्ये भिडतील. या मालिकेत सर्वांचे लक्ष कर्णधार केएल राहुलकडे असेल. तर भारतीय ताफ्यात असे तीन फलंदाज आहेत, जे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ताबडतोड फलंदाजी करण्यात पटाईत आहेत. (IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 साठी अशी असू शकते भारताची प्लेइंग 11)

1. ईशान किशन

या मालिकेसाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी युवा फलंदाज ईशान किशनला सलामीला उतरवले जाऊ शकते. यंदाच्या हंगामात या फलंदाजाने आयपीएलमध्ये 418 धावा केल्या. त्यामुळे केएल राहुलला कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकण्यासाठी सलामीला किशनकडून खूप अपेक्षा असतील. अशा परिस्थितीत किशनला संधी मिळाल्यास तो दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करू शकतो.

2. दिनेश कार्तिक

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिकचे आता तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. कार्तिकने आयपीएलमधील आपला फॉर्म कायम ठेवला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो देखील तुफान फलंदाजी करू शकतो. आयपीएल 2022 मध्ये दिनेशने आरसीबीकडून खेळताना फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि त्याच्या संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामने जिंकले.

3. हार्दिक पांड्या

भारतीय संघाचा धोकादायक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचाही आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत समावेश करण्यात आला आहे. टी-20 विश्वचषक 2021 नंतर हार्दिक प्रथमच भारतीय संघात खेळताना दिसणार आहे. तसेच आयपीएल 2022 मोसमात हार्दिकने शानदार फलंदाजी करताना 487 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 8 विकेट्सही घेतल्या. अशा परिस्थितीत हार्दिकची प्रभावी अष्टपैलू कामगिरी दक्षिण आफ्रिकेला महागात पडू शकते.