IND vs NZ 3rd T20I: टॉस जिंकून न्यूझीलंडने घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा भारताचा प्लेयिंग XI

या सामन्यापूर्वी किवी कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Instagram)

हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेचा तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी किवी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज हा सामना भारताने जिंकल्यास मालिकाही जिंकेल. भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका अद्याप जिंकलेली नाही. विराट कोहली याच्या सेनेला आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा आणि इतिहास घडविण्याची सुवर्णसंधी आहे. आजच्या सामन्यासाठी यजमान न्यूझीलंडने प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. स्कॉट कुग्गेलैन ला स्थान देण्यात आले असून ब्लेअर टिकनर ला बाहेर करण्यात आले आहे. दुसरीकडे, भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही. (Keep it Up Youngsters: तिन फोटो-एक पोझ; यजुवेंद्र चहल, विराट कोहली आणि केएल राहुल)

या मैदानावर एकूण 19 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 9 वेळा पहिले फलंदाजी करणार्‍या संघाने विजय मिळविला आहे, तर 8 वेळा लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या संघाने विजय मिळविला आहे. यापूर्वी ऑकलँडमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला आणि 2-0 ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना मालिका विजयाचा निर्णय घेईल. भारताने सामना जिंकला तर पहिल्यांदा किवी देशात टी-20 मालिका जिंकेल. दुसरीकडे, किवी संघ मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या दोन्ही सामन्यात शानदार कामगिरी बजावली होती. शिवाय, भारताच्या फलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली होती. विशेषतः केएल राहुल आणि श्रेयस अय्यर. श्रेयसच्या उपस्थितीत टीम इंडियाची मधलीफळी  झाली आहे.

तिसऱ्या टी-20 साठी असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन

टीम इंडिया: रोहित शर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी.