IND vs NZ 2nd Test: रहाणे-जडेजा आणि इशांत शर्माची मुंबई कसोटीतुन एक्झिट; ‘या’ खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी
मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर हा निर्णायक कसोटी सामना रंगणार आहे. किवींविरुद्ध अखेरच्या सामन्यापूर्वी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. याचाच अर्थ भारतीय संघ मोठ्या बदलांसह मुंबई कसोटीत उतरणार आहे.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आजपासून सुरू होत आहे. मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा निर्णायक कसोटी सामना रंगणार आहे. टीम इंडिया (Team India) सध्या दुखापतींशी झुंज देत आहे. किवींविरुद्ध अखेरच्या सामन्यापूर्वी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतींमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. याचाच अर्थ भारतीय संघ मोठ्या बदलांसह मुंबई कसोटीत उतरणार आहे. रहाणेला “किरकोळ डाव्या हाताच्या हॅमस्ट्रिंगचा त्रास” झाला आहे तर पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी इशांतच्या डाव्या हाताचे बोट डिसलोकेट झाले होते. तसेच जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली, असे बीसीसीआयने (BCCI) पुढे सांगितले. अशा परिस्थितीत आता या तीन खेळाडूंची दुखापत अन्य खेळाडूंसाठी मोठी संधी ठरू शकते. (IND vs NZ 2nd Test 2021: दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला तिहेरी झटका; इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून OUT)
रहाणे 2013 मध्ये कसोटी पदार्पणापासून टीम इंडियाच्या मधल्या फळीचा मुख्य सदस्य बनला आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्याच्या खराब फॉर्मने संघातील त्याच्या जागेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याशिवाय किवींविरुद्ध कानपुर टेस्ट सामन्यात बॅटने खराब प्रदर्शनानंतर मुंबई कसोटीत त्याच्या खेळण्यावरही संभ्रम होता. मात्र आता रहाणेला दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी आता सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विकेटकीपर केएस भरत असे पर्याय टीम इंडियाकडे उपलब्द आहेत. तथापि रिद्धिमान साहा संघाचा प्रमुख विकेटकीपर असल्यामुळे रहाणेच्या जागी भरतऐवजी सूर्यकुमार यादवला पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते. याशिवाय पण अष्टपैलू जडेजाची भरपाई कोण करणार, हे एक कोडेच आहे, कारण सध्या टीम इंडियाकडे त्याच्या दर्जाचा खेळाडू नाही, जो फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही योगदान देऊ शकेल.
त्याचबरोबर इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. अशा परिस्थितीत जडेजाच्या जागी कोणाकडे पाहिलं जाणार, हा मोठा निर्णय असेल. संघाकडे पाहता, सध्या फिरकीपटू जयंत यादव आणि प्रसिद्ध कृष्णा हे पर्याय आहेत, जे त्याच्या जागी खेळू शकतात. दरम्यान मुंबईच्या खेळपट्टीवर नजर टाकली तर प्रसिद्ध कृष्णाची शक्यता जास्त असली तरी यादवचा दावाही नाकारता येणार नाही. प्रसिद्ध कृष्णाला संधी दिल्यास तो मुंबई कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. त्यामुळे मोक्याच्या क्षणी या खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ कोणत्या समीकरणाने मैदानात उतरते हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.