IND vs NZ 2020: न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित टी-20 सामन्यांसाठी टीम इंडिया बदल करण्याचा विराट कोहली ने दिला इशारा, 'या' खेळाडूंना मिळू शकते स्थान
न्यूझीलंड आणि टीम इंडियामधील चौथा टी-20 सामना वेलिंग्टन रीजनल स्टेडियममध्ये 31 जानेवारी रोजी खेळला जाईल.
न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने (Indian Team) 3-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा न्यूझीलंडच्या भूमीवर टी-20 मालिका जिंकली. सलग 3 सामने जिंकल्यानंतर भारताने मालिका जिंकली आहे, पण आता कोहलीने उर्वरित सामन्यांसाठी संघात बदल करण्याचा इशारा दिला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हर सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की आम्ही मालिका जिंकली आहे आणि आता उर्वरित सामन्यासाठी बेंचवरील खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार कोहली म्हणाला की, मालिकेच्या उर्वरित सामन्यांमध्ये ते संघातील इतर खेळाडूंना खेळण्याची संधी देतील. न्यूझीलंड आणि टीम इंडियामधील चौथा टी-20 सामना वेलिंग्टन रीजनल स्टेडियममध्ये 31 जानेवारी रोजी खेळला जाईल. (Video: रोहित शर्मा ने सुपर ओव्हरमध्ये सलग 2 षटकार मारल्यावर उत्साही विराट कोहली ने मैदानात धाव घेत 'हिटमॅन'ला मारली मिठी)
“आम्ही 5-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करू. सुंदर आणि सैनी सारखे काहीजण बाहेर बसले आहेत, जे खेळ खेळण्यास पात्र आहे. उर्वरित दोन खेळ जिंकण्याचा सध्या विचार करत आहोत,” कोहली म्हणाला. सुपर ओव्हरमध्ये 18 धावा फटकावल्यामुळेन्यूझीलंडने सामन्यात नियंत्रण मिळवले होते, मात्र पहिल्या चार चेंडूत आठ धावा करत भारताने प्रत्युत्तर दिले आणि दोन चेंडूत 10 धावा आवश्यक असताना रोहित शर्माने दोन षटकार मारत यजमानांना सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले.
आजवर झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारत एकाच प्लेइंग इलेव्हनसह खेळला आहे. विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत, संजू सॅमसन, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर, फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना अद्याप या मालिकेत एकही संधी मिळालेली नाही. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या दोन सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंचा समावेश करण्याच्या संघ व्यवस्थापन प्रयत्नात असेल.