IND vs AUS 1st Test 2024: शुभमन गिलच्या जागी 'हा' खेळाडू पर्थ कसोटीत करु शकतो पदार्पण! देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला आहे कहर

भारताच्या शेवटच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयातील युवा नायकांपैकी एक गिल हा फलंदाजीचा मुख्य आधार आहे आणि जर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला तर भारताची शीर्ष फळी कमकुवत दिसू शकते.

Shubman Gill (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia National Cricket Team: शनिवारी भारताला मोठा धक्का बसला जेव्हा आघाडीचा स्टार फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाला, त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy 2024-25) पहिल्या कसोटीतून तो बाहेर जाऊ शकतो. भारताच्या शेवटच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयातील युवा नायकांपैकी एक गिल हा फलंदाजीचा मुख्य आधार आहे आणि जर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला तर भारताची शीर्ष फळी कमकुवत दिसू शकते. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना गिलला दुखापत झाली आणि दुखापतीनंतर तो खूप त्रासलेला दिसला.

गिलच्या बोटाला दुखापत

या प्रकरणाची माहिती असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे आणि कसोटी सुरू होण्यास एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, उजव्या हाताचा स्टाईलिश फलंदाज गिलला सुरुवातीचा सामना गमावण्याचा धोका आहे. (हे देखील वाचा: Border Gavaskar Trophy 2024-25: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, हेड टू हेड रेकॉर्ड, सामना कधी आणि कुठे पाहणार विनामूल्य? एका क्लिकवर घ्या जाणून)

गिलची अनुपस्थिती संघासाठी खूप कठीण

अंगठ्याचे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी साधारणतः 14 दिवस लागतात ज्यानंतर त्या व्यक्तीने त्याचे नियमित नेट सत्र सुरू करणे अपेक्षित असते. पण ॲडलेडमध्ये 6 डिसेंबरपासून दुसरी कसोटी सुरू होत आहे, त्यामुळे त्या सामन्यासाठी तो वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. गिलची अनुपस्थिती राष्ट्रीय संघासाठी खूप कठीण आहे कारण तो तिसऱ्या क्रमांकावर महत्त्वाचा फलंदाज आहे आणि रोहितच्या अनुपस्थितीत तो यशस्वी जयस्वालसह डावाची सुरुवात करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

केएल राहुलही जखमी

दुसरीकडे, लोकेश राहुललाही संघाच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध कृष्णाच्या शॉर्ट बॉलने कोपर दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. राहुलच्या दुखापतीच्या भागाला 'आयसिंग' आवश्यक असल्याने शनिवारी सरावाच्या दुसऱ्या दिवशी तो मैदानात उतरला नाही. मात्र, खबरदारी म्हणून ही कारवाई करण्यात आली.

ईश्वरनला मिळू शकते पदार्पणाची संधी 

गिल अनुपस्थित राहिल्यास भारतासमोर फारसे पर्याय नसल्यामुळे अभिमन्यू इसवरनला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. मात्र, आताच वडिला झालेल्या रोहित शर्माने तीन दिवसांच्या सरावासाठी संघात सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी असेल.