IPL Auction 2025 Live

IND vs AUS 1st ODI: शिखर धवन, हार्दिक पांड्याची झुंज व्यर्थ, टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाची मालिकेत 1-0 ने आघाडी

या विजयासह कांगारू संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

हार्दिक पांड्या आणि शिखर धवन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिले फलंदाजी करत भारतीय संघाला (Indian Team) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर Sydney Cricket Ground) खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात दिलेल्या 375 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 308 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि यजमान संघाने 66 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी अनुक्रमे 74 आणि 90 धावांचा डाव खेळला पण टीमला विजय मिळवून देण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही. या विजयासह कांगारू संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघात 29 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर दुसरा वनडे सामना खेळला जाईल. धवन आणि हार्दिकला वगळता भारतासाठी मयंक अग्रवाल 22, विराट कोहली 21 आणि रवींद्र जडेजाने 25 धावा केल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी अ‍ॅडम झांपाला (Adam Zampa) सर्वाधिक 4 तर जोश हेझलवूडला (Josh Hazlewood) 3 तर मिशेल स्टार्कला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 1st ODI: युजवेंद्र चहल वनडेमधील भारताचा सर्वात महागडा फिरकीपटू, सिडनी मॅचमध्ये नोंदवला लाजीरवाणी रेकॉर्ड)

375 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी मयंक आणि धवनच्या जोडीने आश्वासक सुरुवात केली. मयंक आणि धवनने 25 चेंडूत नाबाद 50 धावांची अर्धशतकी भागिदारी झाली. पण हॅझेलवूडने 53 धावांवर भारताला पहिला धक्का दिला आणि 22 धावा करून खेळणाऱ्या मयंकला माघारी धाडलं. त्यांनतर 1 धावा करून खेळणाऱ्या कर्णधार विराटचे सीमारेषेवर झांपाने झेल सोडला. मात्र, हेजलवूडच्या गोलंदाजीवर कर्णधाीर फिंचने चूक केली नाही आणि विराटचा झेल घेतला. हेझलवूडने त्याच ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरला अवघ्या 2 धावांवर परतीचा रास्ता दाखवला. केएल राहुलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो देखील 12 धावा करून स्टिव्ह स्मिथच्या हाती झेलबाद होऊन स्वस्तात माघारी परतला. मात्र, नंतर धवन आणि हार्दिकच्या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लबोल करत संघाचा डाव सावरला. दोंघांनी शतकी भागीदारी करत संघाच्या आशा उंचावल्या. धवन आणि हार्दिकने अर्धशतक करत संघाचा स्कोर दोनशे पार नेला. पाचव्या विकेटसाठी दोंघांमध्ये 129 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर अखेर झांपाने धवनला पॅव्हिलिअनला पाठवत ही भागीदारी मोडली.

यापूर्वी, कर्णधार आरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ यांचे शतक आणि डेविड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 374 धावांचा डोंगर उभारला. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. फिंचने 114 तर स्मिथने 105 धावा केल्या तर वॉर्नरने 69 आणि मॅक्सवेलने 45 धावांचे योगदान दिले.