ICC T20I Rankings: आयसीसी टी-20 क्रमवारी जाहीर; केएल राहुल दुसऱ्या स्थानी कायम तर, विराट कोहली याची एका स्थानाची झेप
या क्रमवारीत भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने 816 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका स्थानाची झेप घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज (3 फेब्रुवारी) टी -20 फलंदाजांची ताजी क्रमवारीका जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) 816 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एका स्थानाची झेप घेतली आहे. आयसीसीच्या टी-20 फलंदाजाच्या क्रमवारीत विराट 697 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर, इंग्लंडचा डेव्हिड मालन 915 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आजम 801 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (788) याची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा वार डर डुसेन 700 गुणांसह पाचव्या स्थानी पोहचला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील दोन देशांमधील मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांनंतर क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. हे देखील वाचा- Ravindra Jadeja इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता
या क्रमवारीत न्यूझीलंडचे फलंदाज मार्टिन गप्टिल आणि डेव्हन कॉनवे यांना मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या टी -20 सामन्यात कॉनवेने 99 धावा केल्या होत्या. ज्यामुळे आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने थेट 17 व्या स्थानी झेप घेतली आहे. याचबरोबर दुसऱ्या टी-20 सामन्यात 97 धावांची खेळी करणारा गप्टिल 11 व्या स्थानी पोहचला आहे.
आयसीसी टी-20 गोलंदाजाच्या क्रमावारीच्या पहिल्या दहामध्ये एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान मिळवता आले नाही. या क्रमवारीत अफगाणिस्थानचा राशिद खान 736 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर न्युझीलंडचा टीम साऊथी सहाव्या, मिशेल सॅटनर सातव्या, तर, ईस सोढी 11 व्या क्रमांकावर आहे.