जेव्हा एमएस धोनी याने गमावला स्वतःवरचा ताबा, मोहम्मद शमी याला भर मैदानात सुनावले खडेबोल, जाणून घ्या 'तो' किस्सा

शमीने फलंदाज मनोज तिवारी सोबत लाईव्ह चॅट सत्रादरम्यान हा खुलासा केला. हा किस्सा भारताच्या 2014 न्यूझीलंड दौऱ्यावरचा आहे.

एम एस धोनी, मोहम्मद शमी (Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) मैदानात त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. यामुळेच त्याला 'कॅप्टन कूल'ही म्हटले जाते. परंतु जेव्हा खेळाडूंनी चूक केली तेव्हा त्याने कर्णधार म्हणून कठोर पण अगदी अनन्य मार्गाने त्यांना समजावले. अशीच एक आठवण भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने शेअर केली, जेव्हा धोनीने म्हणाला की मी तुमचा कर्णधार आहे, तेव्हा मला मूर्ख बनवू नकोस. शमीने फलंदाज मनोज तिवारी सोबत लाईव्ह चॅट सत्रादरम्यान हा खुलासा केला. हा किस्सा भारताच्या (India) 2014 न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावरचा आहे. वेलिंग्टनमध्ये दुसरा टेस्ट सामना खेळला जातात होता. त्याच सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅंडन मॅकलमने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत कसोटी कारकीर्दीतील सर्वाधिक 302 धावा केल्या होत्या. (Lockdown: एमएस धोनी रांची फार्म हाऊसमध्ये मुलगी जिवा आणि कुत्र्यासोबत करतोय कॅचिंगचा सराव, पाहा Cute व्हिडिओ)

त्या सामन्याची आठवण काढत शमी म्हणाला की, "विराट कोहलीने माझ्या बॉलवर मॅकलमचा 14 धावांवर खेळताना झेल सोडला. त्यावेळी मला वाटलं की ठीक आहे हरकत नाही, आपण याला बाद करु. मात्र मॅक्युलमने मिळालेल्या संधीचा फायदा घेत आमची चांगलीच धुलाई केली. त्यावेळी मॅक्युलमने चहापानापर्यंत फलंदाजी केली. यानंतर माझ्याच गोलंदाजीवर भारतीय खेळाडूंनी आणखी एका फलंदाजाचा झेल सोडला. त्यानंतर मला खूप राग आला होता, मी एक बाऊन्सर चेंडू टाकला, जो धोनीच्या डोक्यावरुन जात थेट सीमारेषेबाहेर गेला.” यावर धोनीने शमीकडे जाऊन, "तुझ्या गोलंदाजीवर मॅक्युलमचा झेल सोडला ही गोष्ट खरी आहे पण तुला तो बाऊन्सर चेंडू टाकण्याची गरज नव्हती,' असं विधान केले. त्यावेळी मी माझ्या हातून चेंडू निसटला असं तो धोनीला म्हणाला. यावर धोनी कडक शब्दात म्हणाला, “हे बघ, माझ्यासमोर अनेक लोकं आले आणि गेले, खोटं बोलू नकोस. मी सिनीअर आहे आणि कॅप्टन आहे, मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नकोस."

दुसरीकडे, शमीने धोनीचं कौतुकही केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केलं, त्यामुळे मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचंही शमीने मान्य केलं.