हरभजन सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत, 'द 100' टी-20 लीगमध्ये होणार सहभागी

इंग्लंडमध्ये पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या 'द हंड्रेड' क्रिकेट लीगसाठीच्या खेळाडूंचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

हरभजन सिंह (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट संघातून बर्‍याच दिवसांपासून दूर असलेला फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने बहुधा निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड (England) मध्ये पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या 'द हंड्रेड' (The Hundred) क्रिकेट लीगसाठीच्या खेळाडूंचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेत हरभजन हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. हरभजनने 2016 मध्ये टीम इंडियासाठी अखेरचा सामना खेळला होता. आणि त्यानंतर या तीन वर्षांत तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही पंजाब संघासाठी सक्रिय नव्हता. आणि आता तो आयपीएलमध्ये वर्षातून एकदाच त्याच्या फिरकीची जादू दाखवतो. भज्जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला असला तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत भज्जीचे नाव 'द हंड्रेड' च्या मसुद्यात नाव समाविष्ट झाले आहे आणि त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्त होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयने (BCCI) हरभजनच्या  निवृत्तीबाबतच्या चर्चा फेटाळून लावले आहेत. पण, लीग सुरू होण्यासाठी अजून काही काळ शिल्लक आहे त्यामुळे, हरभजन निवृत्त होऊन या स्पर्धेत भाग घेऊ शकतो असा विश्वास दर्शवला जात आहे. 'द हंड्रेड लीग'मध्ये सामील होण्यासाठी हरभजनची किंमत एक लाख पौंड म्हणजेच सुमारे 88 लाख भारतीय चलनात आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून परवानगी न घेता जर भज्जी या स्पर्धेत सामील झाला तर बीसीसीआय त्याला एनओसी जरी करू शकते. असेच काहीसे युवराज सिंह याच्यासह देखील झाले होते.

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने 'द हंड्रेड' ही एक नवीन स्पर्धा सुरु केली आहे. त्याची पहिली आवृत्ती पुढील वर्षी जुलैमध्ये सुरु होणार आहे. सिटी फ्रँचायझी फॉर्मेटवर आधारित या स्पर्धेत 8 संघ असतील. सामन्यात दोन्ही डावात शंभर चेंडू टाकल्या जातील. सर्व फ्रँचायझींमध्ये महिला आणि पुरुष संघ असतील. हरभजन सध्या चेन्नई सुपर किंग्जकडून टी-२० क्रिकेट खेळत आहे. भारतीय संघाकडून 103 टेस्ट सामने खेळणार्‍या हरभजनने 190 डावांमध्ये 417 विकेट्स घेतल्या आहेत. वनडे मालिकेत हरभजनने 236 सामने खेळले आहेत आणि 227 डावात 269 विकेट घेतल्या आहेत.