Golden Tweets 2021 in India: पॅट कमिन्सला मिळाले ‘गोल्डन ट्विट’चा किताब, ‘या’ ट्विटला मिळाले सर्वाधिक लाइक्स, पहा संपूर्ण यादी

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सचे भारतातील कोविड-19 साठी त्याच्या देणगीबद्दलचे ट्विट या वर्षातील सर्वात “रिट्विट केलेले ट्विट” होते, तर विराट कोहलीने आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करणारे ट्विट या वर्षी भारतात सर्वाधिक पसंत केले गेलेले ट्विट ठरले.

पॅट कमिन्स आणि विराट कोहली व मुलगी वामिका (Photo Credit: Instagram)

गुगल आणि अ‍ॅपलनंतर आता मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) 2021 मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर येणार्‍या ट्विट, लाईक्स आणि कमेंट्सची यादी जाहीर केली आहे. ट्विटर इंडियाने 2021 मध्ये भारतात ट्विटरवर वर्चस्व गाजवणाऱ्या ट्रेंड, हॅशटॅग आणि ट्विटची यादी जारी केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सचे (Pat Cummins) भारतातील कोविड-19 मदत (India COVID-19 Relief) प्रयत्नांना त्याच्या देणगीबद्दलचे ट्विट हे वर्षातील सर्वात “रिट्विट केलेले ट्विट” होते, तर विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करणारे ट्विट या वर्षी भारतात मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंत केले गेलेले ट्विट ठरले. अहवालात 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2021 दरम्यान भारतातील ट्विटर अकाउंटद्वारे रीट्विट्स/लाइक्सच्या संख्येचे विश्लेषण करण्यात आले आहे.

“कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने भारतावर आघात केल्याने, जगभरातील लोक देशाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले. त्यांच्यापैकी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्स होता, ज्याने भारतात कोविड रिलीफसाठी देणगी दिली आणि इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी ट्विटरवर पोस्ट शेअर केयी. त्याच ट्विटच्या उदारतेला देशभरातील लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला ज्यामुळे हे 2021 मधील भारतातील सर्वात जास्त रिट्विट केलेले ट्विट बनले आहे,” Twitter ने म्हटले आहे. कमिन्सच्या ट्विटला आत्तापर्यंत 114,000 वेळा रिट्विट केले गेले असून या वर्षी (21,900) ट्विट केलेले सर्वात जास्त कोट देखील होते. दुसरीकडे, यंदा वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी मुलगी वामिकाचे आगमन झाले. त्यांच्या मुलीच्या आगमनाची घोषणा करणारे कोहलीचे ट्विट या जोडप्याच्या चाहत्यांनी आणि संपूर्ण भारताने उत्स्फूर्तपणे स्वीकारले व ते 2021 चे “सर्वाधिक पसंत केलेले ट्विट” (538,200 लाईक्स) बनले.

इतकंच नाही तर गब्बा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजयाबद्दल #TeamIndia चे अभिनंदन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट या वर्षी “सरकारमधील सर्वाधिक पसंतीचे ट्विट” (298,000 लाईक्स) ठरले. याशिवाय क्रीडा प्रकारात, IPL दरम्यान एमएस धोनीच्या मॅच-विनिंग खेळाबद्दल कोहलीचे कौतुक करणारे ट्विट या वर्षीच्या खेळात सर्वाधिक रिट्विट झाले. कोहलीचे हे पोस्ट 91,600 वेळा रिट्विट केले गेले आणि 2021 मध्ये स्पोर्ट्समध्ये सर्वाधिक पसंत केलेले ट्विट (529,500 लाईक्स) बनले.