ENG vs NZ Test 2021: इंग्लंडने 15 सदस्यीय संघाची केली घोषणा; IPL खेळाडूंना विश्रांती तर 2 युवा क्रिकेटपटूंचा केला समावेश
2 जून रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर मालिकेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएल 2021 खेळल्यानंतर परतलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
ENG vs NZ Test 2021: न्यूझीलंड (New Zealand) विरोधात जून महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने (England) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. 2 जून रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर (Lords Cricket Ground) मालिकेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएल (IPL) 2021 खेळल्यानंतर परतलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शिवाय, ग्लॉस्टरशायरचा यष्टिरक्षक-फलंदाज जेम्स ब्रेसी (James Bracey) आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) यांना पहिल्यांदा टेस्ट संघात स्थान मिळाले आहे. जखमी झालेल्या आणि विश्रांती घेतलेल्या खेळाडूंच्या संदर्भात सिल्व्हरवूड म्हणाले, “रद्द झालेल्या आयपीएलनंतर आता क्वारंटाईनमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंना वाढीव विश्रांती देण्याची आम्हाला गरज वाटली. आम्हाला त्यांचे मानसिक रीचार्ज करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर ते क्रिकेटमध्ये कधी कमबॅक करतील यावर आम्ही विचार करू.” (Ashes 2021-22 Schedule: इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या अॅशेस मालिकेचे वेळापत्रक जाहीर; ब्रिस्बेनमध्ये शुभारंभ तर 26 वर्षानंतर पर्थ येथे रंगणार अंतिम सामना)
आयपीएल 2021 मधून परतलेले मोईन अली, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, सॅम कुरन आणि क्रिस वोक्स यांच्यासारख्या खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर विश्रांती देण्यात आली आहे. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांना दुखापतीमुळे नकार देण्यात आला आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या काळात ब्रेसी आणि रॉबिन्सनच्या प्रभावी फॉर्ममुळे त्यांना पहिली संधी मिळाली आहे. ब्रेसीने या मोहिमेमध्ये आतापर्यंत 53 च्या सरासरीने 478 चॅम्पियनशिप धावा केल्या आहेत, तर रॉबिनसनने 14 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंका आणि भारत दौऱ्यावर राखीव खेळाडू म्हणून गेलेले ब्रेसी आणि रॉबिन्सन इंग्लंडच्या सेटशी दोघेही परिचित आहेत. याशिवाय, गेल्या वर्षाच्या वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत ते विस्तारित यजमान संघाचे सदस्य होते. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक सिल्व्हरवुड म्हणाले की, “कसोटी क्रिकेटचा हंगाम आकर्षक होईल. जगातील अव्वल दोन संघ, न्यूझीलंड आणि भारत यांच्या विरोधात खेळणे ही आमच्यासाठी उत्तम तयारी आहे कारण आम्ही वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेपूर्वी आमच्या खेळात सुधारत करत राहू.”
इंग्लंड संघ: जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जेम्स ब्रेसी, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, ऑली स्टोन आणि मार्क वुड.