CSK vs MI, IPL 2021: रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी, ‘हा’ विशेष रेकॉर्ड करणारा बनेल भारताचा नंबर-1 फलंदाज

आयपीएलच्या या ब्लॉकबस्टर सामन्यात मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा एका ऐतिहासिक विक्रमाकडे वाटचाल करेल. रोहित खेळाच्या सर्वात लहान स्वरुपात 400 षटकारांचा एवरेस्ट सर करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनेल.

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

CSK vs MI, IPL 2021: दुबईत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या यूएई लेगच्या पहिल्या सामन्यात रविवारी एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आमनेसामने येणार आहेत. आयपीएलच्या या ब्लॉकबस्टर सामन्यात मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एका ऐतिहासिक विक्रमाकडे वाटचाल करेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक रोहित, चार भारतीय फलंदाजांपैकी एक आहे ज्यांनी टी-20 क्रिकेटमध्ये 300 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत. रोहितने आतापर्यंत टी-20 मध्ये एकूण 397 षटकार मारले आहेत आणि तो खेळाच्या सर्वात लहान स्वरुपात 400 षटकारांचा एवरेस्ट सर करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनेल. रोहितने इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्यापैकी 224 षटकार मारले आहेत. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना 173 षटकार आणि उर्वरित 51 आयपीएल (IPL) मध्ये सलामीवीराच्या पहिल्या तीन वर्षांच्या काळात आले होते, जेव्हा तो डेक्कन चार्जर्ससाठी खेळत होता. (IPL 2021: चैन्नईविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सने संघात केला मोठा बदल, 'या' वेगवान गोलंदाजाला घेतलं संघात)

दरम्यान, रोहित 324 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैनापेक्षा (Suresh Raina) खूप पुढे आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली 315 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्स कर्णधार एमएस धोनी 303 षटकार मारून सध्या चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात या दोन जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून एकमेकांविरुद्ध दोन्ही संघांचा रेकॉर्डविषयी बोलायचे तर दोन्ही संघ आयपीएलमध्ये 31 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने चेन्नईला 19 वेळा तर धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने 12 वेळा विजय मिळवला आहे. तसेच गेल्या सात सामन्यांपैकी मुंबईने 6 सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, आयपीएलचा पहिला टप्पा पुढे ढकलण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. चेन्नईने त्यांच्या सात पैकी 5 सामने जिंकले आणि दोन गमावले. तर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाच वेळा आयपीएल विजेत्या संघाने 7 पैकी 4 जिंकले आणि 2 मध्ये पराभूत झाले आहेत.