Tilak Verma (Photo Credit - X)

ICC Men's T20I Batting Ranking: भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान, आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या वर्षीच्या टी-20 क्रमवारीत अनेक बदल दिसून येत आहेत. विशेषतः टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने (Tilak Verma) मोठी कमाल केली आहे. त्याने एका स्थानाची झेप घेतली आहे आणि यासह तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग सध्या 855 आहे. दरम्यान, तिलक वर्मा एका स्थानाने पुढे सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता थेट 832 वर पोहोचले आहे. तिलक वर्मा पहिल्यांदाच आयसीसी टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

सूर्यकुमार यादव आणि जोस बटलरच्या क्रमवारीत कोणताही बदल नाही

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत फलंदाजीने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्ट याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो आता 782 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या टॉप 5 मध्ये झालेला हा एकमेव बदल आहे, पण तो खूप मोठा आहे. दरम्यान, भारताचा सूर्यकुमार यादव 763 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. जोस बटलर 749 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ सहाव्या क्रमांकावर बाबर आझम आणि सातव्या क्रमांकावर पथुम निस्सांका आहे.

हे देखील वाचा: IND vs ENG 3rd T20I 2025: ‘सूर्या’ पुन्हा एकदा अपयशी, खराब फॉर्म सोडत नाहीये पाठलाग; पाहा कर्णधाराची आकडेवारी

मोहम्मद रिझवानने बाजी मारली, यशस्वी जैस्वालची घसरण

मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने न खेळता एक स्थान मिळवले आहे, तर भारताचा यशस्वी जैस्वाल देखील खेळला नाही, परंतु तो एका स्थानाने खाली आला आहे. मोहम्मद रिझवान 704 रेटिंगसह 8 व्या क्रमांकावर आणि यशस्वी जयस्वाल 685 रेटिंगसह 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा कुसल परेरा 675 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे.