पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘Broken Jaw’ च्या उदाहरणातून दिली विद्यार्थ्यांना प्रेरणा; 'जम्बो' अनिल कुंबळे यांनी मानले आभार
'परीक्षा पे चर्चा' इंटरएक्टिव सत्रात पंतप्रधान मोदींनी सोमवारी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काही उदाहरणे दिली, यातील एकात कुंबळेचाही उल्लेख केला.
टीम इंडियाचे दिग्गज गोलंदाज आणि अनेक विक्रम नोंदवणारे अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) इंटरएक्टिव सत्रात पंतप्रधान मोदींनी सोमवारी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काही उदाहरणे दिली, यातील एकात कुंबळेचाही उल्लेख केला. 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पट्टी बांधून कुंबळेने एका सामन्यात कश्या प्रकारे गोलंदाजी केली याचा उल्लेख केला होता. हे फक्त कुंबळेसाठी अभिमानाची गोष्ट नाही तर ती भारतीय क्रिकेटसाठीही मोठी गोष्ट आहे. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी कुंबळे शिवाय माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड यांचीही उदाहरणे मोदींनी दिली. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात सकारात्मक विचारसरणीचा संदेश देण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांना 2001 च्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, "क्रिकेट टीमला धक्का बसला होता. वातावरण तितके चांगले नव्हते. पण द्रविड आणि लक्ष्मणने त्या क्षणी जे केले ते आपण कधीही विसरू शकतो का? त्याने सामन्याचा निकाल बदलला.
नंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अँटिगा कसोटीत कुंबळेच्या प्रयत्नांचा उल्लेखही केला. “तसंच, दुखापत झाल्यावरही कुंबळेने केलेली गोलंदाजी कोण विसरू शकेल. ही प्रेरणा आणि सकारात्मक विचारांची शक्ती आहे.” त्यांनी कुंबळेचे प्रयत्न आणि द्रविड-लक्ष्मणमधील 376 धावांची भागीदारी ही “प्रेरणा आणि सकारात्मक विचारांची शक्ती” असल्याचे म्हटले, ज्यामुळे भारताने अविश्वसनीय बदल घडवून आणले आणि विजय मिळवला. पंतप्रधान मोदींच्या प्रेरणादायी भाषणाची दखल घेत कुंबळे यांनी भारतीय पंतप्रधानांचे आभार मानले आणि लिहिले: “परीक्षा पे चर्चामध्ये उल्लेख केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी धन्यवाद. परीक्षा लिहिणाऱ्या प्रत्येकाला शुभेच्छा.”
2001 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्या दरम्यान द्रविड आणि लक्ष्मणने खूप धैर्य दाखवले. दुसर्या डावात द्रविडने 180 आणि लक्ष्मणने 281 धावा केल्या आणि भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. दोन्ही खेळाडूंच्या शानदार कामगिरीने भारताने सामना 171 धावांनी जिंकला. शिवाय, दुसर्या घटनेत पंतप्रधान मोदींनी कुंबळेचा उल्लेख केला. कुंबळेने 2002 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध तुटलेल्या जबड्याने गोलंदाजी केली आणि सामना अनिर्णित करण्यास मोलाचे काम केले होते.