Rashid Khan याच्या नावे गोलंदाजीच्या अनोख्या रेकॉर्डची नोंद, 21व्या शतकात एका टेस्ट सामन्यात सर्वाधिक ओव्हर फेकणारा बनला पहिला गोलंदाज
21व्या शतकात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात राशिद सर्वात जास्त ओव्हर फेकणारा गोलंदाज बनला आहे. त्याने या कसोटी सामन्याच्या दोन डावात एकूण 99.2 ओव्हर फेककेले आणि 11 गडी बाद केले.
Rashid Khan 21st Century Bowling Record: अफगाणिस्तानचा (Afghanistan) युवा फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) दुसर्या कसोटी सामन्यात 21व्या शतकाच्या नव्या विक्रमाची नोंद केली आहे. 21व्या शतकात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात राशिद सर्वात जास्त ओव्हर फेकणारा गोलंदाज बनला आहे. त्याने या कसोटी सामन्याच्या दोन डावात एकूण 99.2 ओव्हर फेककेले आणि 11 गडी बाद केले. रशीदने पहिल्या डावात 36.3 ओव्हर गोलंदाजी करत 138 धावा देत चार विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात 62.5 ओव्हर टाकले आणि 137 धावा देत 7 विकेट घेतल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नने (Shane Warne) 2002 मध्ये 98 ओव्हर फेकल्या होत्या. श्रीलंकेचा ऑफस्पिनर गोलंदाज आणि कसोटीतील सर्वाधिक विकेट घेणारा मुथय्या मुरलीधरनने 1998 मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात 113.5 ओव्हर गोलंदाजी केली आणि 16 विकेट घेतल्या होत्या.
दरम्यान, एका कसोटीत फेकल्या गेलेल्या सर्वाधिक ओव्हरचा विक्रम इंग्लंडच्या बॉबी पीलच्या नावावर आहे. जानेवारी 1985 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात त्यांनी 146.1 ओव्हर गोलंदाजी केली होती. या दरम्यान त्याने 6 गडी बाद केले होते. दुसरीकडे, राशिदच्या कसोटी करिअरबद्दल बोलायचे तर अफगाण फिरकीपटूने आजवर 5 कसोटींमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 104 धावा देत 11 विकेट्स उत्तम प्रदर्शन केले. सामन्यात, अफगाणिस्तानने पहिला डाव 545 धावांवर घोषित केला त्यानंतर, झिम्बाब्वेला पहिल्या डावात 287 धावांवर गुंडाळलं. फॉलोऑननंतर झिम्बाब्वेने दुसर्या डावात 365 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या दुसर्या डावात कर्णधार सीन विल्यम्सने शतक ठोकले आणि 151 धावा करून नाबाद परतला. झिम्बाब्वेकडून डोनाल्ड तिरिपानोने 95 धावा केल्या. अफगाणिस्तानने पहिल्या डावाच्या जोरावर 258 धावांची आघाडी घेतली होती. यानंतर, फॉलोऑन खेळत दुसऱ्या डावात त्यांनी 365 धावा केल्या आणि अफगाणिस्तानला 108 धावांचे टार्गेट दिले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 4 विकेट गमावून सामना जिंकला. यासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
अबू धाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला दोन दिवसांत 10 गडी राखून पराभूत केले होते.