IPL Auction 2025 Live

13 Years of Hitman: रोहित शर्माने आजच्या दिवशी 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले होते डेब्यू, 6 वर्षे 'फ्लॉप' राहिल्यानंतर आज लगावला आहे शतकांचा अंबार

आजपासून 13 वर्षांपूर्वी रोहितने आयर्लंडविरुद्ध पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात सामना खेळला, म्हणजे या दिवशी रोहितने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2007 मध्ये रोहितच्या कारकीर्दीची सुरूवात झाली आणि मे 2013 पर्यंत त्याने अत्यंत सरासरी कामगिरी केली.

रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

किंग ऑफ पुल शॉट, सिक्सर मशीन, हिटमॅन... या नावांचा उपयोग फक्त एका फलंदाजासाठी केला जातो आणि ते म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma). रोहित आणि त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजपासून 13 वर्षांपूर्वी रोहितने आयर्लंडविरुद्ध (Ireland) पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात सामना खेळला, म्हणजे या दिवशी रोहितने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण (Rohit Sharma ODI Debut) केले. आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या रोहितने पहिल्या सामन्यात फलंदाजी केली नाही. घरगुती क्रिकेटचा सर्वात हुशार फलंदाज मानल्या जाणाऱ्या रोहितला पहिली संपूर्ण 6 वर्षे आपली छाप सोडता आली नाही. 2007 मध्ये रोहितच्या कारकीर्दीची सुरूवात झाली आणि मे 2013 पर्यंत त्याने अत्यंत सरासरी कामगिरी केली. या दरम्यान, मुंबईच्या या फलंदाजाने 81 वनडे सामन्यांमध्ये अवघ्या 30.43 च्या सरासरीने 1978 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार एमएस धोनीने असा क्रांतिकारक निर्णय घेतला, ज्यामुळे केवळ रोहितच नव्हे तर टीम इंडिया आणि विश्व क्रिकेटची दिशाही बदलली. (रोहित शर्मा कसा बनला मुंबई इंडियन्सचा कर्णधार? आर अश्विनसोबत लाईव्ह चॅटमध्ये 'हिटमॅन'ने केला खुलासा)

2013 मध्ये इंग्लंडमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीने सलामीच्या वेळी रोहितला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. तो एक दिवस आहे आणि आजचा एक दिवस, तेव्हापासून रोहितने एकदाही मागे वळून पहिले नाही. सलामी फलंदाज बनतच रोहितने स्वत:ला सिद्ध केले आणि आज तो विश्व क्रिकेटच्या प्रत्येक गोलंदाजाचा काळ ठरला. रोहितने जून 2013 पासून 134 वनडे डाव खेळला असून 59.74 च्या सरासरीने 7050 धावा केल्या ज्यात 27 शतकं आणि 30 अर्धशतकं झळकावली आहेत. सलामी फलंदाज बनताच रोहितने जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम मोडले. सलामी फलंदाज म्हणून रोहितने वनडेमध्ये एक नाही तर तीन दुहेरी शतकं केली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. 2014 च्या कोलकाता सामन्यात रोहितने श्रीलंकाविरुद्ध 264 धावांचा डाव खेळला होता. 264 धावांच्या खेळीदरम्यान रोहित शर्माने 33 चौकार ठोकले जो की एक विश्वविक्रम आहे.

दुसरीकडे, टी-20 मध्येही रोहित 4 शतकं ठोकणाराएकमेव फलंदाज आहे. रोहितने टी-20 मध्ये 35 चेंडूत शतक ठोकले असून त्याने डेविड मिलरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. शिवाय, मागील वर्षी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने पाच शतकं ठोकली होती आणि ही कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.