India Beat Australia: भारतीय फिरकी गोलंदांजी समोर ऑस्ट्रेलियाचा संघ गारद, नागपूर कसोटी एक डाव आणि 132 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी
पहिल्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीत अडकले आणि 32.3 षटकात केवळ 91 धावा करून सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक नाबाद 25 धावा केल्या. टीम इंडियाकडून आर अश्विनने दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 63.5 षटकात अवघ्या 177 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. टीम इंडियाचा पहिला डाव 139.3 षटकांत 400 धावांवर आटोपला. टीम इंडियाने 223 धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या.