National Party Tag: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गमावला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा; निवडणूक आयोगाची माहिती
लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या वैध मतांपैकी किमान 6 टक्के मते त्या पक्षाने मिळवली पाहिजेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा टॅग गमावला आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाव बाहेर गेले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांना त्यांचा 'राष्ट्रीय पक्ष' दर्जा टिकवून ठेवण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी सुनावणी घेतली होती. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली होती. निवडणूक आयोगाने जुलै 2019 मध्ये तिन्ही पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामगिरीनंतर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का रद्द केला जाऊ नये, हे सांगण्यास सांगितले होते. आता निवडणूक आयोगाने तीनही पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टी (AAP) ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
निवडणूक आयोग काही निकषांवर आधारित राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देते. लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या वैध मतांपैकी किमान 6 टक्के मते त्या पक्षाने मिळवली पाहिजेत. पक्षाला लोकसभेत कोणत्याही राज्यातून किमान 4 जागा जिंकणे आवश्यक आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)