Mumbai: बोटीतून निघालेल्या गॅसमुळे 2 जणांचा मृत्यू; 4 जण रुग्णालयात दाखल
नवीन फिश जेट्टी येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कामगार अंजनीपुत्र नावाच्या बोटीतून मासे काढत असताना ही घटना घडली.
मुंबईमध्ये मासेमारी बोटीच्या स्टोरेज चेंबरमध्ये निघालेल्या गॅसमुळे 2 लोकांचा मृत्यू झाला असून 4 जण बेशुद्ध पडले आहे. बेशुद्ध पडलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवालानुसार, नवीन फिश जेट्टी येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कामगार अंजनीपुत्र नावाच्या बोटीतून मासे काढत असताना ही घटना घडली. पहाटे दोनच्या सुमारास ही बोट किना-यावर परतली होती. मासे सडल्यामुळे गॅस निर्माण झाल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली.
अहवालानुसार, आधी बोटीचा मालक पकडलेला मासा आणण्यासाठी बोटीत गेला आणि गॅसमुळे तो बेशुद्ध पडला. त्याला बघायला दुसरा माणूस आत गेला आणि तोही बेशुद्ध पडला. अशाप्रकारे एकूण सहा जण बेशुद्ध पडले. त्यानंतर या सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. रूग्णालयात रूग्णांपैकी एक व्हेंटिलेटरवर आहे तर इतर 3 जणांची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा: Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका येथील कारखान्याला भीषण आग, पाहा व्हिडिओ)