Ahmednagar Shocker: अहमदनगर मध्ये हळदीच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा

यानंतर 59 जणांना तातडीने ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

Food | Image Used For Representational Purpose Only | commons.wikimedia

महाराष्ट्रात सार्वजनिक जेवणातून विषबाधा झाल्याची अजून एक घटना समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) मध्ये हळदीच्या कार्यक्रमात जेवल्याने 200 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील आहे. नवरदेवाच्या हळदीमध्ये सहभागी वर्‍हाड्यांना जेवल्यानंतर उलटी आणि जुलाब चा त्रास होऊ लागला. यानंतर 59 जणांना तातडीने ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तर काहींना खाजगी रूग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले. विषबाधेमुळे प्रकृती बिघडलेल्यांमध्ये 7 लहान मुलांचा देखील समावेश आहे.

घरात लग्न आणि त्यानिमित्ताने हळद असल्याने पाहुण्यांची जेवण व्यवस्था करण्यात आली होती. वर्‍हाडी जेवल्यानंतर अनेकांना त्रास होण्यास सुरूवात झाली. अचानक ग्रामीण रूग्णालयात 59 जण दाखल असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला तसेच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानीचे वृत्त नाही. पोलिसांनी या विषबाधेच्या घटनेची दखल घेतली असून रूग्णालयात पोलिस पोहचले आहेत.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रसाद म्हणून दिलेल्या अन्नातूनही विषबाधा झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. बुलढाण्यातील लोणार तालुक्यात भगर आणि आमटीमधून जवळपास 500 नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यांच्यावर रस्त्यावर उपचार करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील वायरल झाला आहे. न्यायालयाने देखील या प्रकाराचा जबाब विचारला आहे. Buldhana Food Poisoning: बुलढाण्यात 500 जणांना 'प्रसादा'मधून विषबाधा; रस्त्यावरच उपचार दिले जात असल्याचा व्हिडिओ वायरल .

अकोला शहरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मुलांना शाळेत दिले जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.