Vishnudas Bhave Gaurav Padak: प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर दिवशी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्य विद्यामंदिर याठिकाण दामले यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
प्रशांत दामले (Prashant Damle) यांना नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक (Vishnudas Bhave Gaurav Padak) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी नाट्य क्षेत्रात विक्रमांचा बादशाह म्हणून प्रशांत दामले यांच्याकडे पाहिले जाते. देशा-परदेशामध्ये प्रशांत दामले यांच्या नाटकांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी असते. आज त्यांच्या नाट्यक्षेत्रातील सेवेला मानाच्या विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर करून सन्मानित केले गेले आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली यांच्याकडून देण्यात येणारा आणि नाट्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा विष्णुदास भावे गौरवपदक पदक पुरस्कार यंदा प्रशांत दामलेंना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमी कलाकार, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते अभिनेते प्रशांत दामले यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली आहे.
रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर दिवशी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्य विद्यामंदिर याठिकाण दामले यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार समारंभाचे हे 55 वे वर्ष आहे. रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते.
प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी सध्या देशा-परदेशामध्ये 'एका लग्नाची पुढची गोष्ट'चे प्रयोग करत आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच सध्या अमेरिकेमध्येही या नाटकाचे प्रयोग लावण्यात आले आहेत. सोबतच दामलेंच्या संस्थेचं 'नियम व अटी लागू' नाटक देखील रसिकांच्या पसंतीला उतरलं आहे. त्याचेही मुंबई, पुण्यात जोरदार प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचेही परदेश दौरे झाले असून आता त्यांचा चमू भारतात आला आहे.