Jaya Prada Faces Six Month Jail Sentence: ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांना चेन्नई कोर्टाने सुनावली 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
जया प्रदा आणि इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितले.
चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना अनेक वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रायपेटा, चेन्नई येथे त्यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचार्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात त्यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जया प्रदा, त्यांच्या व्यावसायिक भागीदारांसह, चेन्नईमध्ये पूर्वी एक चित्रपटगृह चालवत होत्या. मात्र, आर्थिक नुकसानीमुळे काही वर्षांपूर्वी सिनेमा हॉल बंद करावा लागला होता. हा सिनेमा हॉल चेन्नईचे राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. थिएटर कामगारांना ईएसआय देण्यास व्यवस्थापन अपयशी ठरल्याने समस्या सुरू झाली आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली. थिएटरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनी जया प्रदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि आरोप केला की, त्यांनी त्यांच्या पगारातून कपात केलेली कर्मचारी राज्य विमा (ESI) रक्कम परत केली नाही.
नंतर, अभिनेत्रीने कर्मचार्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. मात्र, कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी त्यांच्या अपीलवर आक्षेप घेतला, त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित जया प्रदा आणि इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. (हेही वाचा: Nitin Desai Death Case: नितीन देसाई मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून एडलवाईस अधिकाऱ्यांना अंतरिम दिलासा नाही; 18 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)