दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या डॉक्टरकडून COVID-19 ची सौम्य लक्षणं असणार्‍यांसाठी वैद्यकीय औषधांचा सल्ला? जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असलेल्या मेसेज मागील सत्य

ICMR च्या हवाल्याने काही औषधं घेण्याचा सल्ला देखील दिला जात आहे.

Fake Prescription For COVID-19 (Photo Credits: WhatsApp)

भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या जशी वाढत आहे तशीच या आजाराच्या भीतीचा गैरफायदा घेत काही चूकीच्या बातम्या, फेक न्यूज पसरवण्याचं काम देखील वाढलं आहे. सध्या फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील झपाट्याने चूकीचं वृत्त पसरत आहे. माहितीची तथ्यता न तपासता अनेक जण मेसेज फॉरवर्ड करत असल्याने फेक न्यूजचं जाळ पसरत आहे. सध्या दिल्लीच्या Sir Ganga Ram Hospital च्या डॉक्टरांच्या हवाल्याने कोव्हिड 19 ची सौम्य लक्षणं असणार्‍या रूग्णांसाठी कोणती काळजी घ्यायला हवी त्याबाबतचेही मेसेज व्हायरल होत आहेत. ICMR च्या हवाल्याने काही औषधं घेण्याचा सल्ला देखील दिला जात आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर Sir Ganga Ram Hospital च्या नावाने, त्यांच्या डॉक्टरांच्या खोट्या स्वाक्षरीने औषधं आणि उपचार पद्धतीचा सल्ला दिला जात आहे. मात्र हा व्हायरल मेसेज हॉस्पिटलकडून प्रसिद्ध करण्यात आला नसल्याचं सर गंगाराम हॉस्पिटलने स्पष्ट केले आहे.

व्हायरल मेसेजचं ट्वीट

दरम्यान या व्हायरल मेसेज मध्ये hydroxychloroquine 400 mg आठवड्यातून एकदा, Vitamin Cच्या गोळ्या आठवड्यातून एकदा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये घशामध्ये खवखव, ताप याबाबतही औषधं सुचवण्यात आली आहेत. मात्र कोणत्याही लक्षणांमध्ये स्वतःच्या मनाने औषधं घेणं टाळा. कोरोनाची लक्षणं दिसताच जवळच्या हॉस्पिटलमध्ये सल्ला घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे.