IPL Auction 2025 Live

धक्कादायक: 'तो' गेल्या तीस वर्षांपासून करत आहे नव्या नवरीप्रमाणे सोळा शृंगार, वावरत आहे साडीवेशात; कारण वाचून व्हाल थक्क (Photo)

जलालपूर परिसरातील हौज खास खेड्यातील रहिवासी 66 वर्षीय चिंताहरण चौहान उर्फ करिया असे या व्यक्तीचे नाव आहे.

भारतीय नवरी-प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

मृत्यू हे जीवनाचे शाश्वत सत्य आहे, मात्र सर्वजण त्याला घाबरतात. याच मृत्युच्या भीतीपोटी एक माणूस साडी, सोळा शृंगार, दागिने अशा वेशात तब्बल 30 वर्षे वावरत आहे. विडंबन म्हणा किंवा विवशता मात्र हीच वास्तविकता आहे. योगायोग किंवा नियतीचा खेळ इतका विचित्र असतो की, कुटुंबातील 14 लोकांना गमावल्यावर आता या व्यक्तीच्या नशिबी नारीवेश आला आहे. महिलांचा पोशाख परिधान करूनच ही व्यक्ती उदरनिर्वाहासाठी कमाई करत आहे. जलालपूर परिसरातील हौज खास खेड्यातील रहिवासी 66 वर्षीय चिंताहरण चौहान उर्फ करिया असे या व्यक्तीचे नाव आहे.

वयाच्या 14 व्या वर्षी चिंताहरणचे पहिले लग्न झाले. त्यानंतर सहा वर्षंनी पश्चिम बंगालमधील दिनाजपूर येथे एका वीटभट्टीवर मजुरीसाठी तो कामाला लागला. पुढे जिथे तो घरगुती समान खरेदी करत असे त्याच दुकानदाराच्या मुलीशी त्याने लग्न केले. जेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी या लग्नावर आक्षेप घेतला तेव्हा त्याने तातडीने आपल्या बंगाली पत्नीला सोडले व तो घरी परतता. या धक्क्याने या बंगाली मुलीने आत्महत्या केली.

चिंताहरण चौहान उर्फ करिया

त्यानंतर चिंताहरणचे तिसरे लग्न झाले. लग्नाच्या काही महिन्यांनंतर, तो आजारी पडला आणि त्याच्या कुटुंबातील लोक एक-एक करत मरण पावू लागले. चिंताहरणचे वडील राम, मोठा भाऊ, त्याची पत्नी इंद्रावती, दोन मुले, धाकटा भाऊ या सर्वांचा अगदी अल्प अंतराने मृत्यू झाला. यानंतर चिंताहरणच्या भावांच्या तीन मुली आणि चार मुलेही मरण पावली. या दरम्यान, त्याची बंगाली पत्नी सतत त्याच्या स्वप्नात येत असे. फसवणूकीचा आरोप करीत त्याने आपल्याला सोडल्याने आपल्याला किती दुःख झाले ही गोष्ट कथन करत असे. (हेही वाचा: कलयुग: मुलीच्या लग्नानंतर जावयाच्या 22 वर्षाच्या भावावर आईचा जडला जीव; लग्नगाठ बांधून झाली लेकीची थोरली जाऊ)

चिंताहरणने अनेकवेळा तिची माफी मागितली व स्वतःला आणि कुटुंबाला माफ करण्याची विनंती केली. त्यावेळी तिने आपल्याला सतत वधूवेशात स्वतःजवळ ठेऊन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच दिवसापासून चिंताहरण वधू वेशात वावरत आहे. जणूकाही  या वधूवेशात त्याची बंगाली पत्नीच त्याच्यासोबत रहात आहे. अंधश्रद्धा असली तरी एका पुरुषाने स्त्रीवेशात वावरणे या गोष्टीला गावकऱ्यांनी मान्यता दिली आहे. सुरुवातीला चिंताहरणला या गोष्टीचा त्रास झाला मात्र नंतर त्याला सवय झाली. जेव्हा पासून तो स्त्रीवेशात वावरत आहे तेव्हापासून त्याची व त्याच्या उर्वरीत दोन मुलांची तब्येत बरीच सुधारली आहे. अशाप्रकारे त्याने स्वतःला व आपल्या दोन मुलांना मृत्युपासून वाचवली आहे.