Bullet Thali: 4 किलो मांसाहाराची बुलेट थाळी 60 मिनिटांत फस्त करा आणि Royal Enfield bike जिंका; पुण्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकाचं खवय्यांना चॅलेंज

यापूर्वी देखील त्यांनी रावण थाळी चं आयोजन केले होते. त्यासोबतच या हॉटेलमध्ये बकासूर थाळी, पेहलवान मटण थाळी, सरकार मटण थाळी उपलब्ध आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

कोरोना वायरस संकटानंतर पुन्हा अनलॉक सुरू झाला आहे. लोकं बाहेर पडायला सुरूवात झाली आहे. मात्र त्यांना आपल्या हॉटेलमध्ये आकर्षित करण्यासाठी वडगाव, मावळ जवळील शिवराज हॉटेलच्या मालकाने अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे. खवय्यांना या हॉटेलने दिलेल्या चॅलेंजनुसार, जर ग्राहकाने 60 मिनिटांमध्ये 4 किलो मांसाहाराच्या विविध पदार्थांचा समावेश असलेली बुलेट थाळी (Bullet Thali) संपवली तर त्यांना रॉयल एनफिल्ड बुलेट (Royal Enfield bike) गिफ़्ट केली जाणार आहे. सध्या पुण्याजवळच्या परिसरात या अनोख्या चॅलेंजची चर्चा आहे.

हॉटेल शिवराजच्या बुलेट थाळीमध्ये मांसाहाराचे 12 विविध पदार्थ आहेत. त्यामध्ये 4 किलो मटण आणि माशांचा समावेश आहे. दरम्यान बुलेट थाळीत फ्राईड सुरमई, पापलेट फ्राय, चिकन तंदुरी, सुकं मटण, काळं मटण, चिकन मसाला आणि कोलंबी बिर्याणी अशा 12 विविध पदार्थांची मेजवानी असेल. या बुलेट थाळीची किंमत 2500 रूपये आहे. तर ती संपवण्यासाठी तासाभराचा अवधी आहे. जर ग्राहकाने तासाभरात ती संपवल्यास त्यांना 1.65 लाखाची बुलेट बक्षीस म्हणून मिळणार आहे.

सध्या पुण्यात अनेक ठिकाणी हे बॅनर्स झळकलेले बघायला मिळाले आहेत. त्याला खवय्यांचा प्रतिसादही उत्तम असल्याची माहिती हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.

आता सहाजिकच तुम्हांला प्रश्न पडला असेल की आतापर्यंत कुणी ही बुलेट थाळी संपवण्यात यशस्वी झालंय का? तर याचं उत्तर हो आहे. अतुल वायकर यांनीच दिलेल्या माहितीनुसार सोलापूरच्या सोमनाथ पवार यांनी ही थाळी संपवली आणि बुलेट जिंकली आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी अजून 4 गाड्या बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या आहेत.

हॉटेल शिवराज कडून अशाप्रकारे स्पर्धा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी देखील त्यांनी रावण थाळी चं आयोजन केले होते. त्यासोबतच या हॉटेलमध्ये बकासूर थाळी, पेहलवान मटण थाळी, सरकार मटण थाळी उपलब्ध आहेत.