भंगारात विकलेली लोखंडी खुर्ची मँचेस्टर मधील रेस्टॉरंट बाहेर दिमाखात उभी; पहा Viral Video
सांगली मधील तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडे यांच्या माया मंडप डेकोरेटर्स मधील ही खुर्ची आहे.
काय ते नशीब! सांगलीत भंगारात विकलेल्या लोखंडी खुर्चीला परदेश गमनाचा योग आला आणि आता ती मँचेस्टरच्या एका रेस्टॉरंट बाहेर दिमाखात उभी आहे. सांगली मधील तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडे यांच्या 'माया मंडप डेकोरेटर्स' मधील ही खुर्ची आहे. विशेष म्हणजे ही खुर्ची त्यांनी 15 वर्षांपासून भंगारात विकली होती. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले (Sunandan Lele) यांनी या खुर्चीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या खुर्चीबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आणि तिचा प्रवास 'सांगली टू लंडन' (Sangli to London) प्रवास उघड झाला.
मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर मराठीत नाव आणि गाव लिहिलेल्या खुर्चीने लेले यांचे लक्ष वेधले आणि त्यांनी बाळू लोखंडे यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. लेले यांचा लोखंडे यांच्या संपर्क झाला असून त्यांनी फोनवरुन संवाद साधत त्यांना खुर्चीबद्दल सांगितले. बाळू लोखंडे यांचा मागील काही वर्षापासून सावळज येथे मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. माया मंडप डेकोरेटर्स या नावाने ते हा व्यवसाय करतात. ते मंडप डेकोरेटर्स मधील सर्व वस्तूंवर नावे टाकत असतात. त्यांचीची ही खुर्ची.
पहा व्हिडिओ:
ही लोखंडी खुर्ची 13 किलो वजनाची असल्याने 15 वर्षांपूर्वी त्यांनी ती भंगारात विकून स्टिकच्या खुर्च्या घेतल्या. मात्र भंगारात विकलेली खुर्ची मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर सुस्थितीत असल्याचं पाहून त्यांना आश्चर्य आणि समाधानही वाटलं. तसंच या खुर्चीमुळे माझ्या जुन्या व्यवसायातील साहित्याची आठवण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुनंदन लेले परदेशात फिरताना अनेक नवनवीन गोष्टी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशीच एक खुर्ची त्यांच्या नजरेस पडली आणि तिचा प्रवास सर्वांसमोर आला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.