नवीन वर्षासाठी Rishi Sunak यांनी चक्क शौचालयातून शेअर केला जनतेसाठी संदेश? युके पंतप्रधानांचा मागे टॉयलेट फ्लश दिसत असलेला एडिटेड व्हिडीओ व्हायरल (Watch)
ते एका खुर्चीवर बसले असून, त्यांच्या मागे शेकोटी, टेबल लॅम्प अशा गोष्टी दिसत आहेत. सुनक यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ त्यांच्या अधिकृत निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला होता.
नुकतेच जगभरात नववर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधत जगभरातील अनेक नेत्यांनी आपल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (UK Prime Minister Rishi Sunak) यांनीही नवीन वर्ष 2023 निमित्त आपल्या लोकांना सावध राहण्याचा संदेश दिला. शनिवारी 42 वर्षीय पंतप्रधानांनी लोकांना सांगितले की, त्यांचे सरकार जनतेचे जीवन सुधारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, त्यामुळे जनतेने नवीन वर्षाबद्दल आशावादी राहावे. ते म्हणाले की 2023 मध्ये आव्हाने असतील, परंतु सरकार नेहमीच लोकांच्या प्राधान्यांना प्राधान्य देईल. आपल्या नवीन वर्षाच्या संदेशात, सुनक यांनी तीन गोष्टींबद्दल भाष्य केले- अभिमान, आश्वासन आणि निष्पक्षता.
यूके पंतप्रधानांच्या या अतिशय सकारात्मक व्हिडिओ संदेशानंतर, अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येऊ लागले, ज्यात ब्रिटिशचे पंतप्रधान चक्क शौचालयातून हे सर्व आशादायक संदेश देताना दिसत होते. व्हिडिओमध्ये, जेव्हा सुनक आपला विश्वास पुनर्संचयित करण्याबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांच्या मागे टॉयलेट फ्लश दिसत होता. व्हिडिओमध्ये काही साउंड इफेक्ट्सदेखील ऐकू येत आहे. बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. त्यावरून लोकांनी अंदाज बांधला की, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी चक्क टॉयलेटमधून नवीन वर्ष 2023 चा संदेश दिला. (हेही वाचा: नरेंद्र मोदींनी आईच्या मृत्यूपश्चात विधींचा भाग म्हणून 'मुंडन' केलं? जाणून घ्या वायरल फोटो मागील सत्य)
ऋषी सुनक यांचा संपादित केलेला व्हिडीओ-
परंतु जेव्हा व्हिडिओची सत्यता तपासली तेव्हा आढळले की या व्हिडीओचे फुटेज एडीट केले आहे. एडीट केलेली क्लिप सर्वात प्रथम @jasemonkey वापरकर्त्याने पोस्ट केली होती. त्यानंतर वापरकर्त्याने आणखी काही साउंड इफेक्ट्ससह दुसरा व्हिडिओ अपलोड केला. युजरने हा एडीट करण्यासाठी वापरलेली क्लिप ऋषी सुनक यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून घेण्यात आली होती.
ऋषी सुनक यांचा मूळ व्हिडीओ-
सुनक यांनी संदेशाचा जो मूळ व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये ते एका रूममध्ये असल्याचे दिसत आहे. ते एका खुर्चीवर बसले असून, त्यांच्या मागे शेकोटी, टेबल लॅम्प अशा गोष्टी दिसत आहेत. सुनक यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ त्यांच्या अधिकृत निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला होता. हाच व्हिडीओ युजरने एडीट करून सुनक हे रूमच्या ऐवजी शौचालयात बसल्याचे दाखवले. भारतीय वंशाचे पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंब 10, डाउनिंग स्ट्रीटच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले आहेत.