अबब! ३८ मुलांची आई आहे ३९ वर्षांची महिला, १३ व्या वर्षी दिला होता पहिल्या बाळाला जन्म
आता बोला. झालात ना अवाक! होय, वय आणि अपत्यांचा ताळमेळ घालताना आपला गोंधळ उडणे शक्य आहे. पण, खरोखरच असे घडले आहे. जाणून घेऊया 39 वर्षीय मरियम नाबातंजी या महिलेची कहाणी.
जगभरात घडणाऱ्या अनेक घटनांपैकी काही घटना अशा असतात की, त्यावर विश्वास बसणे तसे कठीण. त्या खरोखरच वास्तवात घडलेल्या असतात. त्याचा ढळढळीत पुरावाही समोर दिसत असतो. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याखेरीच आपल्याकडे पर्यायच उरत नाही. आता या महिलेचेच पाहा ना. ही महिला आहे युगांडा (Uganda) देशातील. मरियम नाबातंजी (Mariam Nabatanzi) असे या महिलेचे नाव. या महिलेचे प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार सध्याचे वय आहे 39 वर्षे आणि ती आहे तब्बल 38 मुलांची आई. आता बोला. झालात ना अवाक! होय, वय आणि अपत्यांचा ताळमेळ घालताना आपला गोंधळ उडणे शक्य आहे. पण, खरोखरच असे घडले आहे. जाणून घेऊया 39 वर्षीय मरियम नाबातंजी या महिलेची कहाणी.
मरियम नाबातंजी हिचा विवाह अगदीच लहान वयात झाला. केवळ 13 व्या वर्षी. आपल्याकडील भाषेत बालविवाहच म्हणा ना. विवाह झाल्यावर पहिल्याच वर्षी म्हणजे वयाच्या 13 व्या वर्षी तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. आज ती 38 मुलांची आई आहे. प्रतिवर्ष एक असे जरी म्हटले तरी, ती 26 मुलांची आई असायला हवे होते. तरीही ती 38 मुलांची आई आहे कारण तीने तब्बल 6 वेळा चक्क जुळ्या, चार वेळा तीळ्या आणि तीन वेळा चक्क चार मुलांना जन्म दिला आहे.
मरियम नाबातंजी हिने पहिल्यांदा जुळ्या मुलाला जन्म दिला तेव्हा तिने बर्थ कंट्रोल (अपत्य नियंत्रण) करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. मात्र, डॉक्टरांना तिला सांगितले होते की, बर्थ कंट्रोल करण्याची औषधं ही तिच्या जीवितासाठी घातक ठरु शकतात. तसेच, इतर महिलांच्या तुलनेत तुझे गर्भाशय मोठे असल्याचेही डॉक्टरांनी मरियम नाबातंजी हिला सांगितले होते. गर्भाशय मोठे असल्यामुळे तुला दोन किंवा त्यापेक्ष अधिक मुलं होऊ शकतात असे डॉक्टर तिला म्हणाले होते. डॉक्टरांशी बोलणे झाल्यानंतर मरियम नाबातंजी हिने कधीत अपत्य नियंत्रण करण्याबाबत आवश्यक असलेली औषधं घेतली नाहीत. ती मुलं जन्माला घालतच गेली. विशेष म्हणजे मरियम नाबातंजी ही आपल्या मुलांची एकटीच काळजी घेते. (हेही वाचा, छत्तीसगढ: एका महिलेने दिला 6 बालकांना जन्म, राज्यातील पहिलीच घटना)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आपल्या गर्भावस्थेमध्ये तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिने सहाव्या वेळी जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र त्यातील एका मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. दरम्यान, तिच्या पतीने अचानक तिची साथ सोडली. तीन वर्षांपासून पतीशिवाय ती एकटीच राहते. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ती सांगते की, तीचा संपूर्ण दिवस मुलांची देखभाल आणि त्यासाठी आवश्यक असणारा पैसा जमा करण्यातच जातो. माझी मुलं अत्यंत समजदार आहेत. मोठी मुलं छोट्या मुलांची देखभाल करतात. त्यामुळे मला त्यांच्या उपजिविकेसाठी पैसे कमावता येतात, असेही तिने सांगितले. (हेही वाचा, आश्चर्यम: महिलेने नॉर्मल डिलिव्हरीद्वारे दिला तब्बल 7 मुलांना जन्म; बाळ-बाळंतीण सुखरूप)
प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, मरियम नाबातंजी हिचे बालपणही अत्यंत हालाकीचे गेले. मरियम नाबातंजी जन्माला आल्यावर अवघ्या तीन दिवसांतच तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिच्या वडीलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई तिचा छळ करत असे. धक्कादायक असे की, सावत्र आईने तिच्या 5 भाऊ आणि बहिणींना विष देऊन ठार मारले. तसेच, तिच्या वडीलांना वेगवेगळ्या महिलांपासून झालेली तब्बल 45 मुलं होती असेही ती सांगते. डोळ्यांना आणि कानांना पाहाला, ऐकायला मिळूनही विश्वास ठेवायाला कठीण वाटावी अशीच ही घटना. अफ्रीका न्यूज, डेली मेल यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमांध्यमांपासून अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रसारमाध्यमांनीही या महिलेबाबत वृत्त दिले आहे.