मुंबई: सायन हॉस्पिटलमधील निष्काळजीपणानंतर KEM हॉस्पिटलमधील धक्कादायक व्हिडिओ समोर; एकाच बेडवर दोन कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असल्याचा प्रकार उघडकीस
सायन हॉस्पिटलनंतर केईएम रुग्णालयातील कोविड 19 वार्डमधील गैरसोयीचा व्हिडिओ समोर आल्याने पुन्हा एकदा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कोरोना व्हायरस रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आहे. संपूर्ण राज्यभरातील सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात असून सध्या मुंबईत 12864 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. ही संख्या दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी आणि रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज आहे, असे सांगून नागरिकांना आश्वस्त केले जाते. परंतु, काही दिवसांपूर्वी सायन हॉस्पिटलमधील (Sion Hospital) कोविड 19 वॉर्डमधून समोर आलेल्या एका व्हिडिओने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर पुन्हा एकदा समोर आलेल्या या नव्या व्हिडिओने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
नव्याने समोर आलेला व्हिडिओ हा केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) आहे. या व्हिडिओत कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह काळ्या प्लॉस्टिकमध्ये गुंडाळून वॉर्डच्या बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. तसंच दोन पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण एकाच बेडवर दिसत आहेत. अनेक रुग्ण जमिनीवर झोपलेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोशल डिस्टिसिंगचे नियम न पाळता एकमेकांच्या जवळपास वावरताना दिसत आहेत. या सर्व प्रकारावर केईएम हॉस्पिटलचे डॉ. हेमंत देशमुख यांनी हा व्हिडिओ कोविड 19 वॉर्डमधील नसल्याचे म्हटले आहे. हे संपूर्ण चित्र धक्कादायक असून यामुळे रुग्णांसह इतरांचा जीवलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मुंबईवरील संकट कमी होण्याऐवजी त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता अधिक आहे. (मुंबई: सायन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल; BMC चे चौकशीचे आदेश)
यापूर्वी अशाच प्रकारचा निष्काळजीपणाचा व्हिडिओ सायन हॉस्पिटलमधून समोर आला होता. या व्हिडिओत कोरोना बाधित रुग्णांवर मृतदेहाशेजारी उपचार सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. ते मृतदेह काळं प्लास्टिक किंवा कपडा टाकून गुंडाळले होते. दरम्यान BMC ने या घटनेची दखल घेत सायन हॉस्पिटलच्या डिनला प्रमोद इंगळे यांची हकलपट्टी केली आहे.