कोरोना संकट काळात 'मास्क' घालणं आवश्यक असल्याचं सांंगत मुंबई पोलिसांनी शेअर केलं खास ट्वीट

मुंबई पोलिस आणि पोलिस कमिशनर परमबीर सिंह यांच्याकडून नागरिकांना मास्क घातल्याशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन

Mumbai Police (Photo Credits: Mumbai Police Twitter)

मुंबईमध्ये आता हळूहळू कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश मिळत आहे. दरम्यान यामध्ये आता मिशन बिगीन अगेन देखील सुरू झालं आहे. मात्र या परिस्थितीमध्ये पुन्हा कोरोना झपाट्याने वाढू नये याकरिता प्रशासन सज्ज आहे. त्यांना आता मुंबई पोलिसांकडूनही मदत मिळत आहे. मागील 3 -4 महिन्यापासून मुंबई पोलिस रस्त्यांवर मुंबईकरांच्या सोयीसाठी सज्ज आहे. मात्र त्यासोबतच आता सोशल मीडियामध्येही मजेदार पण तितकेच चपखल आणि प्रसंगी डोळ्यात अंजन घालणारे काही मेसेज ट्वीट केले जातात. आजही कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक काळजी घेण्यासोबत हात धुणं आणि मास्क घालून बाहेर पडणं या सवयींचा विसर पडू नये म्हणून खास ट्वीट केलं आहे. कोरोनाची 'गुगली' घेण्याचं आवाहन करताना गुगलीच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये 'ओ' या अक्षरावर मास्क घालत त्यांनी मजेशीर क्रिएटीव्ह शेअर केले आहे.

मुंबई पोलिस ट्वीट

मुंबई पोलिस कमिशनर परम बीर सिंह यांनी देखील टेक्नॉसॅव्ही होत मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन करत त्याचा तुमच्या सुरक्षेवर थेट परिणाम होऊ शकतो असं म्हटलं आहे.

मुंबई पोलिस कमिशनर ट्वीट

दरम्यान मुंबईमध्ये आता रूग्णसंख्या नियंत्रणामध्ये येताना चित्र आहे. मुंबईमध्ये काल २४ तासात बरे झालेले रुग्ण १०११ होते. आजवर बरे झालेले एकूण रुग्ण ६६,६३३ पर्यंत पोहचल्याने बरे झालेल्या रुग्णांचा दर ७०% पर्यंत पोहचला आहे. शहरात एकूण सक्रिय रुग्ण २२,८२८ आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्ण दुप्पटीचा दर ५२ दिवस झाला आहे. तर कोविड वाढीचा दर ७-१३ जुलै दरम्यान १.३४% आहे.