Mango Man Kaleemullah Khan यांनी आमराईत आंब्यांच्या नव्या जातींना कोविडयोद्धांची नावं देत अर्पण केली अनोख्या अंदाजात श्रद्धांजली
कलिमुल्ला खान हे ग्राफ्टिंग तंत्रज्ञान वापरून एकाच झाडामधून विविध प्रजातींच्या आंब्याची निर्मिती करतात.
भारतामध्ये मॅगो मॅन अशी ओळख असलेल्या पद्मश्री विजेत्या Kaleemullah Khan यांनी खास अंदाजात आपली श्रद्धांजली कोविड योद्धांना अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या अमराईतील नव्या आंब्यांच्या जातींना मागील कोरोना संकटाच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस, आरोग्य कर्मचारी अशा कोविडयोद्धांची नावं दिली आहेत. ANI सोबत बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी या उद्देशाची अधिक माहिती दिली आहे. कोविड 19 शी सामना करत कर्तव्य बजावणारे अनेक डॉक्टर, पोलिस मृत्यूमुखी पडले. आता त्यांना अमर ठेवण्यासाठी आंब्यांच्याच नव्या जातींना त्यांची नावं देण्याचा विचार केल्याचं खान म्हणाले आहेत.
देशामध्ये अलौकिक कामगिरी करणार्या व्यक्तिमत्त्वाचा आदर राखण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांच्या नावाने एक आंब्याची प्रजात ठेवण्याचं काम खान यांच्या आमराईत सुरू आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, तरूण, तडफदार नेतृत्त्व अखिलेश यादव यांच्यासोबतच आपल्या सौंदर्याने अनेकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हीचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.
Kaleemullah Khan हे 1987 पासून आंबा व्यवसायामध्ये आहेत. ते 81 वर्षांचे आहेत आणि 65 वर्ष ते आंब्याच्या लागवडीचे काम करत आहेत. या 65 वर्षांत यंदा पहिल्यांदाच राजकीय नाव असलेल्या आंब्यांच्या प्रजातीला आंबा लागलेला नाही. पण 'ऐश्वर्या राय', 'सचिन तेंडुलकर' यांसारख्या सेलिब्रिटींच्या नावाने असलेल्या प्रजातींना चांगलं फळ आहे.
खान हे ग्राफ्टिंग तंत्रज्ञान वापरून एकाच झाडामधून 300 विविध प्रजातींच्या आंब्याची निर्मिती करत आहे. त्यांचा जन्म लखनऊ मध्ये झाला असून ते केवळ 7वी पास आहेत. नंतर ते कुटुंबियांच्या व्यवसायामध्ये जोडले गेले. 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने नावाजले आहे.