Faithful Dog Video: मालकाचा मृत्यू, कुत्रा मात्र चार महिन्यांपासून शवागराबाहेर पाहतोय वाट; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
तो मालकाची वाट पाहतो आहे. त्या मुख्या प्राण्याला आता हे कसे कळावे,की त्याचा मालक आता दुनियेत राहिलाच नाही.
Kozhikode News Today: कुत्रा हा माणसाचा अत्यंत विश्वासू आणि प्रामाणीक मित्र असल्याचे आपण लानपणापासून ऐकत आलेलो असतो. अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमधूनही याचे दर्शन वेळोवेळी घडते. मात्र, वास्तवातही अशी घटना घडली आहे. घटना आहे केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील. एका व्यक्तीला कन्नूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. मात्र, मालकाचा मृत्यू झाल्याची या कुत्र्याला पूर्ण कल्पना नाही. त्यामुळे पाठिमागील चार महिन्यांपासून हा कुत्रा (Faithful Dog Video) रुग्णालयातील शवागराबाहेर तळ ठोकून आहे. तो मालकाची वाट पाहतो आहे. त्या मुख्या प्राण्याला आता हे कसे कळावे,की त्याचा मालक आता दुनियेत राहिलाच नाही.
शवागराबाहेर बसलेल्या कुत्र्याची आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही सवय झाली आहे. शवागराचे दार उघडले की, कुत्र्याचे डोळे चमकतात. तो शेपटी हालवत दरवाजाच्या दिशेने पाहतो. दरवाजा पुन्हा बंद झाला की, त्याचे डोळे काहीसे निराश होतात. शेपटी हलवणे बंद होते. मग काही वेळ इकडेतिकडे दिशाहीन पाहात तो कुत्रा आपले तोंड पुढच्या दोन पायांमध्ये खुपसून पुन्हा बसून राहतो. त्याला कल्पनाही नाही की, शवागराच्या दरवाजातून प्रवेश करणारे कधीच पुन्हा परतत नसतात.
सुरुवातीला हा एक भटका कुत्रा असावा म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, नंतर त्याचा वेगळेपणा त्यांच्या लक्षात आला. आता त्याने रुग्णालयातील एक जागाही आपलीशी केली आहे. शवागराचा दरवाजा उघडला की, तो उठतो कावराबावरा होतो मालक येईल या आपेक्षेने कासावीस होतो. पण, मालक नाही हे लक्षात येताच तो पुन्हा आपल्या जागेवर जातो. मानवाशी लळा लागलेल्या या प्राण्याला कसे पटवून द्यावे की, त्याचा मालक आता राहीला नाही, असा प्रश्न रुग्णालातील कर्मचाऱ्यांनाही सतावतो. वृत्तसंस्था एएनआयने या कुत्र्याचा एक व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.
व्हिडिओ
सुरुवातीला या कुत्र्याने मालकाच्या आठवणीत अन्न खानेही बंद केले होते. मात्र, अलिकडे त्याने हळूहळू अन्न खायला सुरु केले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रेमाने त्याचे नाव 'रामू' असे ठेवले आहे. रामू अनेकदा शवागराच्या व्हरांड्यातून फिरत असतो. रामूचे वर्तन पाहून अनेकांना टोकियो इम्पीरियल युनिव्हर्सिटीचे विद्वान प्रोफेसर हिडेस्बुरो युएनो यांच्या हाचिको कुत्र्याची आठवण येते. प्रोफेसर हिडेस्बुरो युएनो यांचे रेल्वे प्रवासात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तर त्यांचा कुत्रा हाचिको पुढचे प्रदीर्घ काळ त्याच स्टेशनवर त्यांची प्रतिक्षा करत राहिला होता. धक्कादायक म्हणजे हाचिको हा कुत्रा 8 मार्च 1935 रोजी मरण पावला पण तोपर्यंत त्याने आपल्या मालकाची प्रतिक्षा स्टेशनवरच केली.