मुलांना खेळण्यासाठी केरळातील 'या' व्यक्तीने तयार केली मिनी ऑटो रिक्षा (Video)
पाहा या मिनी ऑटो रिक्षेचा धमाल व्हिडिओ...
आपल्या मुलांना खुश करण्यासाठी पालक काहीही करु शकतात. आपली मुलं जगात येण्यापूर्वीपासूनच त्यांना सर्व काही मिळावं, त्यांच जग अधिक सुंदर व्हावं म्हणून पालक झटत असतात. त्यांचे हे प्रयत्न अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतात. अशीच एक कहाणी आहे अरुण कुमार पुरुषोत्तम या केरळात राहणाऱ्या व्यक्तीची. या व्यक्तीने आपल्या दोन मुलांना खेळण्यासाठी एक ऑटो रिक्षा बनवली आहे. 1990 मध्ये आलेल्या मल्याळम सिनेमा आय ऑटो पाहून ही रिक्षा बनवण्याची कल्पना त्याला सुचली. पाच वर्षांच्या मुलाचा आपल्या बहिणीसोबतच व्हिडिओ अनेकांची मने जिंकत आहे.
आय ऑटो हा मल्याळम मधील सर्वाधिक गाजलेला सिनेमा असून त्याची लोकप्रियता अफाट आहे. इडूकी येथे राहणाऱ्या अरुण याने सुंदरी ऑटो रिक्षाचे लहान व्हर्जन बनवले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट होत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सुंदरी सुंदरी हे गाणे वाजते. ही मिनी रिक्षा कशी बनवली, याची माहिती देखील अरुणने या व्हिडिओत सांगितली आहे आणि सोशल मीडियावरील हा व्हिडिओच्या प्रेमात अनेक लोक पडली आहेत.
टॉय कार्स बनवण्यात अरुण यांना सुरुवातीपासूनच खूप रस होता. डेक्कन क्रोनिकल रिपोर्टमध्ये अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला गाड्यांबद्दल खूप आकर्षण होते आणि मला नेहमीच असे टॉयज हवे होते. पण माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते परवडत नसे. सुतारकाम करणाऱ्या माझ्या वडीलांनी माझ्यासाठी लाकडाची चाकं असलेली सायकल बनवली होती. त्यानंतर वडीलांचे पाहुन मी अनेक खेळणी बनवली. विशेषतः गाड्या. जेव्हा मी 10 वीत होतो तेव्हा मलाJCB मॉडेल्स बनवण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. तेव्हापासून माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली.