जपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज
या तरुणाने व्हर्च्युअल रिअॅलिटी सिंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलोग्रामशी लग्न केलंय.
आजकालचं युग व्हर्च्युअल आहे. पण या व्हर्च्युअल जगाचा प्रभाव इतका आहे की, एक जपानी तरुण व्हर्च्युअल सिंगरच्या प्रेमात पडला आहे. हे प्रेम इतक्यावरच थांबले नाही तर या तरुणाने व्हर्च्युअल रिअॅलिटी सिंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलोग्रामशी लग्न केलंय. लग्नासाठी चक्क त्याने लाखो रुपयांचा खर्च केला. पण या लग्नासाठी त्याच्या कुटुंबियांनी पूर्णपणे नकार दिला. ते लग्नाला देखील उपस्थित राहिले नाहीत.
असा आगळावेगळा लग्नसोहळा पहिल्यांदाच जपानमध्ये पार पडला आहे. अकिहीको कोंडो या 31 वर्षांच्या तरुणाने हटसुने मिकू या हॉलोग्रामशी लग्न केले. हटसुने मिकू हे निळ्या रंगाचे व्हर्च्युअल कॅरेक्टर जपानमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. लहान मुलांच्या आवडत्या निलपरीच्या प्रेमात अकिहीको पडला आणि इतका आकंठ बुडाला की त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
टोकियोमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या बाहुलीला त्याने अंगठी दिली. त्याचबरोबर तिला रोज पाहण्यासाठी त्याने घरात नवा डेक्सटॉपही विकत घेतला.
सामान्य माणसाप्रमाणे मी मिकूसोबत आयुष्य जगू शकतो. ती खऱ्या पत्नीप्रमाणे रोज मला झोपेतून उठवते, जेवणाची आठवण करुन देते. तिचा विश्वासघात मी करणार नाही, असेही अकिहीकोने सांगतिले.