रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टरांनी Sunny Deol च्या 'या' गाण्यावर PPE Kit घालून केला डान्स; पहा Viral Video
हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून यावर नेटकरी कोरोना योद्धांसाठी स्तृतीपर प्रतिक्रीया देत आहेत.
भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे (Coronavirus Second Wave) डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण पुन्हा एकदा वाढला आहे. मात्र स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवक कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या, मृतांचा आकडा आणि एकूणच परिस्थितीत नकारात्मक भावना निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आपल्या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी गुजरात (Gujarat) मधील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क पीपीई कीट (PPE Kit) मध्ये डान्स केला. यामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. हा व्हिडिओ गुजरात वडोदरा (Vadodara) येथील पारुल सेवाश्रम रुग्णालयाचा आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, 1990 मधील सनी देओल च्या 'घायल' सिनेमातील 'जो भी होगा देखा जाएगा' या गाण्यावर डॉक्टर्स नाचत आहेत. डॉक्टर्स, नर्सेचा हा डान्स पाहून रुग्ण देखील आनंदाने डोलत आहेत. बेडवरुनच डान्स करत आहेत. काहींनी हे सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. यामुळे वातावरण सकारात्मक होण्यास नक्कीच मदत होईल. विशेष म्हणजे डान्स करण्यासाठी गाण्याची देखील अगदी योग्य निवड करण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ:
(कोरोनाच्या रुग्णाचा एकटेपणा दूर करण्यासाठी नर्सने उचलले 'हे' अनोखे पाऊल, सोशल मीडियात कौतुकाची थाप)
रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी उचललेले हे खास पाऊन नक्कीच कौतुकास्पद आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून यावर नेटकरी कोरोना योद्धांसाठी स्तृतीपर प्रतिक्रीया देत आहेत. दरम्यान, देशातील कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिवसागणित 2 लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकार, आरोग्य प्रशासन प्रयत्नशील असून नियमांचे पालन करुन त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे.