Fact Check: तुम्हालाही आला आहे 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचा मेसेज? वेळीच व्हा सावध, जाणून घ्या काय आहे सत्य
त्यात कोणती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी बरेच लोक त्या लिंकवर क्लिक करतात. लिंकवर क्लिक केल्यावर, तुमच्या Google Pay किंवा Pay फोनद्वारे पैसे कट होतात.
सध्या सोशल मिडीयावर जितक्या खऱ्या बातम्या पाहायला मिळतात अगदी त्याच प्रमाणात खोट्या बातम्यांचाही (Fake News) सूळसुळाट झाला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये नेमक्या कोणत्या बातम्या खऱ्या व कोणत्या खोट्या हे ओळखणे अवघड झाले आहे. त्यात सायबर क्राईम प्रमाणही वाढले आहे. तर तुम्हालाही केबीसीद्वारे 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचा फोन, ई-मेल किंवा मेसेज आला आहे का? जर आला असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. लोकांची फसवणूक करण्याचा हा एक मार्ग असू शकतो, अशी माहिती पीआयबी फॅक्ट चेकने दिली आहे.
एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे तसेच अनेक लोकांनाही हा मेसेज पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, आपण KBC Jio Department कडून 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकली आहे. या मेसेजमध्ये एक Whatsaap नंबर देण्यात आला असून, पुढील माहितीसाठी तिथे संपर्क साधा असे म्हटले आहे. आता पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, हा दावा पूर्णतः खोटा आहे. तसेच हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अशा लॉटरी योजनांपासून सावध राहा, अशा कॉल, मेल आणि मेसेजवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असा सल्लाही पीआयबीने दिला आहे.
अशा प्रकारे केली जाते फसवणूक -
सर्व प्रथम, सायबर गुन्हेगार लोकांना व्हॉट्सअॅपद्वारे किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे लॉटरी जिंकण्याशी संबंधित किंवा मोठ्या वस्तूवर सवलत मिळविण्याशी संबंधित लिंक पाठवतात. त्यात कोणती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी बरेच लोक त्या लिंकवर क्लिक करतात. लिंकवर क्लिक केल्यावर, तुमच्या Google Pay किंवा Pay फोनद्वारे पैसे कट होतात. (हेही वाचा:'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत मिळणार 2.20 लाख रुपयांची रोख रक्कम व 25 लाखांपर्यंतचे कर्ज; जाणून घ्या या व्हायरल मेसेज मागील सत्य)
दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.