Fact Check: COVID-19 मुळे देशात 3 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण Lockdown लागू होणार? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसजमागील सत्य
आजच्या परिस्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवावे लागेल, असे ते म्हणाले होते
देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. भारतात दररोज लाखो कोरोना व्हायरसच्या संसर्गाची नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, अशात भारतामध्ये पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लादले जाणर असल्याची चर्चा आहे. देशात 3 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याचे पोस्ट्स सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हा संदेश पुढे पाठवून आता तो व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक टीमने देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याची वृत्ताची दखल घेत, ही बातमी पूर्णतः खोटी असल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पीएम मोदींच्या मॉर्फेड फोटोसह सूत्रांच्या हवाल्याने उद्धृत केले आहे की, लॉकडाऊनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 3 मे ते 20 मे दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाउन जाहीर केले गेले आहे. यामध्ये असेही सांगितले आहे की, देशातील सर्व राज्यांनी लॉकडाऊनला पाठींबा दर्शविला आहे. त्यांनतर आता पीआयबी फॅक्ट चेक टीमने त्यांच्या ट्विटर हँडलवर ही बातमी खोटी असून, सरकारने याबाबत कोणतीही घोषणा केली नसल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: Fact Check: संसर्गाची दुसरी लाट ही कोरोना विषाणूची नाही? 5G Tower Radiation मुळे लोक आजारी पडत असल्याचा दावा, जाणून घ्या काय आहे सत्य)
20 एप्रिल रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले होते की लॉकडाउन लादण्याचा सरकारचा हेतू नाही. आजच्या परिस्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवावे लागेल, असे ते म्हणाले होते. तसेच राज्यांनीही शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाउनचा वापर करावा अशी त्यांनी विनंती केली होती. सरकारने लॉक डाऊन टाळण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले होते. त्यामुळे 3 मेपासून देशात लॉकडाऊन लागू असल्याची बातमी दिशाभूल करणारी असून त्यावर विश्वास ठेऊ नये असे सांगितले आहे.