Fact Check: बिपिन रावत यांच्या IAF Mi-17 V5 हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हायरल होणार व्हिडिओ खोटा; जाणून घ्या सत्य
या घटनेनंतर सिरीया हेलिकॉप्टरचा व्हिडिओ आजच्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा असल्याचे सांगत व्हायरल करण्यात आला आहे
आज भारतीय हवाई दलाचे (IAF) हेलिकॉप्टर, Mi-17 V5 तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ क्रॅश झाले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat), त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. ही घटना सुलूर आणि कोईम्बतूर दरम्यानच्या Nanjappanchathiram परिसरात घडली. प्रचंड धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर, MI-17V5 हेलिकॉप्टर हवेत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि दावा केला जात आहे की हे तेच Mi-17V5 हेलिकॉप्टर आहे जे आज, बुधवारी क्रॅश झाले होते.
परंतु हा व्हिडिओ आजच्या दुर्घटनेचा व्हिडिओ नसल्याचे समोर आले आहे. खोटा दावा करून व्हिडिओ शेअर केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हेलिकॉप्टर 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये क्रॅश झालेले MI-17 V5 नाही. ते सीरियन Mi17 आहे, जे 2020 मध्ये पाडण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर अल-नायराब, इदलिब येथे पाडण्यात आले होते. ही घटना फेब्रुवारी 2020 मध्ये घडली होती.
हा व्हिडिओ प्रथम 'Babak Taghvaee - The Crisis Watch' नावाच्या एका ट्विटर खात्यावरून शेअर केला होता. हेलिकॉप्टर तुर्की सैन्याने पाडल्याचा दावा ट्विटर युजरने केला होता. ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'एक तासापूर्वी, #Syria अरब हवाई दलाचे हे Mi-17 युटिलिटी हेलिकॉप्टर अल-नायराब, #Idlib वर पाडण्यात आले. अलकायदाशी संलग्न आणि तुर्की समर्थित मिलिशिया याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु हे निश्चितपणे माहित आहे की तुर्कीनेच या हेलिकॉप्टरला लक्ष्य केले आहे.' (हेही वाचा: तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश; लष्कर प्रमुख Bipin Rawat यांच्यासह 13 जणांचा मृत्यू)
तमिळनाडू मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सिरीया हेलिकॉप्टरचा व्हिडिओ आजच्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा असल्याचे सांगत व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका व असे व्हिडिओ किंवा फोटो त्याची सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका.