Fact Check: सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य
आजकाल सोशल मिडियावर अशा अनेक खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या दिसून येतात
एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज (Fake News) पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल मिडियावर अशा अनेक खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या दिसून येतात, जे पाहून नक्की कशावर विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो. अलीकडे सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात लिहिले आहे की, केंद्र सरकार 'प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना' (Pradhan Mantri Berojgar Bhatta Yojana) अंतर्गत बेरोजगारांना (Unemployed People) दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.
जर तुम्हालाही असा कोणताही व्हॉट्सअॅप मेसेज आला असेल, जर त्याला भुलू नका कारण हा संदेश खोटा आहे. या कोरोना साथीच्या काळात बेरोजगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उद्योगधंदे बंद पडले आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत या व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार 'बेरोजगारांना आर्थिक मदत करत आहे.
संदेशात असेही लिहिले आहे की, प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना 2021 साठी पूर्व नोंदणी सुरू आहे. पूर्व नोंदणी करण्यासाठी, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपला फॉर्म भरा. यासाठी पात्रता 10 वी पास, वय 18 ते 40 असणे गरजेचे असल्याचेही नमूद केले आहे. 31 ऑक्टोबर 2021 ही अंतिम मुदत असल्याचेही म्हटले आहे.
आता सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची चौकशी केली असता, हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले. सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे तपासात उघड झाले आहे. पीआयबीने आपल्या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, अशा कोणत्याही संशयास्पद दुव्यांवर क्लिक करू नका, तो फसवणूक करण्याचा प्रयत्न असू शकतो. (हेही वाचा: देशात विक्रमी कोरोना लसीकरण झाल्याच्या आनंदात सरकार देत आहे मोफत 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)
दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.