Fact Check: गेलेल्या रस्त्यावरून 12 तासात परत येताना भरावा लागणार नाही टोल टॅक्स? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
या बातमीची पडताळणी करताना भारत सरकारच्या पत्रकारिता युनिटने (पीआयबी) सांगितले की, हा पूर्णपणे खोटा दावा आहे, नितीन गडगरी यांनी नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आजकाल नेमक कोणत्या गोष्टींबाबत संदेश किंवा बातम्या व्हायरल होतील काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नितीन गडगरी यांनी वाहतूक नियमांमध्ये बदल केल्याचा दावा केला जात आहे. या संदेशानुसार, जर तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान 12 तासांच्या आत परत त्याच मार्गावरून प्रवास करणार असाल, तर तुम्हाला परतीच्या प्रवासावर कोणताही टोल टॅक्स भरावा लागणार नाही. अनेक लोकांनी हा प्राप्त झालेला संदेश पुढे पाठवला आहे. मात्र या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
या व्हायरल मेसेजमध्ये नमूद केले आहे की, ‘टोल नाक्यावर पावती घेताना तुम्हाला एक बाजू की दोन्ही बाजू असे विचारले जाते. त्यावेळी त्या व्यक्तीला पावती 12 तासांची द्या असे सांगा. म्हणजेच तुम्ही 12 तासांच्या आत पुन्हा त्याच मार्गाने परत येणार असाल, तर तुम्हाला 'रिटर्न जर्नी'वर कोणताही टोल टॅक्स आकारला जाणार नाही. ग्राहकांना योग्य माहिती न देता हे टोल नाक्यावरील लोक लाखोंची फसवणूक करतात.’
आता या बातमीची पडताळणी करताना भारत सरकारच्या पत्रकारिता युनिटने (पीआयबी) सांगितले की, हा पूर्णपणे खोटा दावा आहे, नितीन गडगरी यांनी नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टोल टॅक्सचे जुने नियम अजूनही तसेच आहेत, तुम्हाला पूर्वीच्या नियमानुसार स्लिप दिली जाईल. त्यामुळे जर का तुमच्याही मोबाईलवर असा मेसज आला असेल तर तो पुढे पाठवणे टाळा. (हेही वाचा: आधार कार्ड धारकांना सरकार ₹4,78,000 चं कर्ज देत असल्याचं वायरल वृत्त खोटं; पहा पीआयबी चा खुलासा)
दरम्यान, याआधी भारतीय रेल्वेमध्ये 5 वर्षांखालील मुलांचेही आता पूर्ण तिकीट घ्यावे लागणार असल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. त्यावेळीही पीआयबी ट्वीट वरून या वृत्ताचे खंडन करत, 5 वर्षांखालील मुलांच्या तिकीटासाठी बर्थ बूक करायचा की नाही यासाठी पर्याय उपलब्ध आहे. जर बर्थ बूक केले नसेल तर मोफत प्रवास करण्याचाही पर्याय असतो असे सांगितले होते.