Fact Check: 10 सेकंद श्वास रोखून धरणाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होत नाही? काय आहे या व्हायरल मेसेज मागील सत्य?

अनेकजण फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप वरुन येईल ती माहिती फॉरवर्ड करु लागले. त्यामुळे हा संकटकाळ अधिक गंभीर होण्यास खतपाणीच मिळाले.

Representational Image | (Photo Credit-Pixabay)

देशात कोरोना व्हायरसच्या संकटाचा धोका जसा वाढू लागला तसा खोटी माहिती, फेक न्यूज यांचे जाळेही सोशल मीडियावर पसरु लागले. अनेकजण फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप वरुन येईल ती माहिती फॉरवर्ड करु लागले. त्यामुळे हा संकटकाळ अधिक गंभीर होण्यास खतपाणीच मिळाले. सध्या असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 सेकंद श्वास रोखून धरल्यास तुम्हाला कोरोनाची लागण होणार नाही, असा दावा या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

एक दीर्घ श्वास घ्या आणि 10 सेकंद श्वास रोखून धरा. हे तुम्ही न खोकता, शिंकता, कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज करु शकलात तर तुमच्या फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर मोकळ्या हवेत हा प्रयोग करा, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. Relationship Essentials Radio च्या फेसबुक पोस्टमध्येही असा उल्लेख करण्यात आला आहे. (कोरोना व्हायरसचा प्रसार करण्यासाठी भाजी विक्रेत्यांकडून भाज्या आणि फळांवर थुंकण्याचे ऑडिओ खोटे! जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य)

पहा पोस्ट:

ट्विटर पोस्ट:

या मेसेजची पडताळणी माहिती व प्रसारण मंत्रालयाने केली असून हा मेसेज खोटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा मेसेज चुकीची माहिती देत असून 10 सेकंद श्वास रोखून धरल्याने तुम्ही कोरोना व्हायरसपासून मुक्त होऊ शकत नाही, असे त्यांनी ट्विटच्य माध्यमातून स्पष्ट केले आहे. तसंच तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी टेस्ट करणे हा सर्वात योग्य मार्ग आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्विट:

कोरोनाचे संकट भारतात भयंकर रुप धारण करत असून दिवसागणित कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोनाचे एकूण 6412 रुग्ण असून 199 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 504 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे आपण खबरदारी घेणे आणि अधिक सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.