Fact Check: कोविड-19 चे केवळ कारण 5G नेटवर्क टेस्टिंगमुळे लोकांचा मृत्यू? PIB ने केला व्हायरल ऑडिओ क्लिपचा खुलासा

यात अनेकदा दिशाभूल करणारी माहिती समोर येत असून यामुळे नागरिकांचा गोंधळ उडत आहे.

Fake News (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) वेगाने पसरत असताना सोशल मीडिया माध्यमातून विविध बातम्या देखील समोर येत आहेत. यात अनेकदा दिशाभूल करणारी माहिती समोर येत असून यामुळे नागरिकांचा गोंधळ उडत आहे. अशातच एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात  5G नेटवर्क टेस्टिंगमुळे लोकांचा मृत्यू होत असून याला कोविड-19 चे नाव दिले जात आहे, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये अवस्थता निर्माण होऊ नये, म्हणून पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) यामागील सत्याचा खुलासा केला आहे.

देशातील अेक राज्यांमध्ये 5G नेटवर्कचे टेस्टिंग सुरु आहे. ज्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे आणि याला कोविड-19 चे नाव दिले जात आहे, असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. हा दावा खोटा असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तसंच कृपया असे फेक मेसेजेस पसरवून अफवांना वाव देऊ नका, असे पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Fact Check By PIB:

(हे ही वाचा: कोविड-19 वर औषध सापडल्याचा एका व्यक्तीचा व्हिडिओद्वारे दावा; PIB Fact Check ने सांगितले सत्य)

अशा प्रकराचा एक मेसेज यापूर्वी देखील सोशल मीडिया माध्यमांमध्ये व्हायरल होत होता. तेव्हाही पीआयबीने यामागील तथ्य लोकांपर्यंत पोहचवले होते. दरम्यान, कोविड-19 संकटकाळात खोटे मेसेजेच वेगाने पसरत असून त्यामागील सत्याची तपासणी न करता लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत. यामुळेच अफवांचे पेव फुटले आहे. अशा प्रकारच्या मेसेजेचे फॅक्ट चेक केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे.