CM उद्धव ठाकरे यांनी जुनाट रूढींना छेद देत IAS अश्विनी भिडे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या टनेल बोरिंग मशिन शुभारंभचा नारळ वाढवला; सोशल मीडीयात फोटो वायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा मान मराबत बाजूला ठेवून महिला आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या हस्ते कोस्टल प्रोजेक्टच्या टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ करताना नारळ वाढवून घेतला.

Ashwini Bhide Viral Photo| Photo Credits: Twitter/ tanushreevenkat

कोरोनाचं संकट असो किंवा विरोधकांकडून होणारी राजकीय चिखलफेक या सार्‍यांमध्येच मुख्यमंत्री पदावर बसलेल्या उद्धव ठाकरे यांनी कमालीचा संयम दाखवला आहे. त्यांच्या या संयमी नेतृत्त्वाचं अनेकदा सोशल मीडीयात आणि राजकीय वर्तुळामध्ये कौतुकदेखील झाले. काल पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा मान मराबत बाजूला ठेवून महिला आयएएस अधिकारी अश्विनी भिडे (IAS Ashwini Bhide) यांच्या हस्ते कोस्टल प्रोजेक्टच्या टनेल बोरिंग मशिनचा (Launch of Coastal Road Tunnel Boring Machine) शुभारंभ करताना नारळ वाढवून घेतला. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडीयात कौतुक होत आहे.

सर्वसामान्यपणे हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांनुसार महिलांनी नारळ वाढवणं हे शुभ मानलं जात नाही पण कोस्टल रोड प्रोजेक्टच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सार्‍या रुढी-परंपरांना छेद देत आणि पुरोगामी महाराष्ट्राचा पुरस्कार करणार्‍या ठाकरे विचारांचा वसा पुढे नेला. नारळ वाढवण्याच्या प्रसंगी व्यासपीठावर मुंबईचे पालकमंत्री, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह एल अ‍ॅन्ड टीचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र या सार्‍यांनी नारळ वाढवण्याचा आग्रह अश्विनी भिडे यांना केला. त्यांनी देखील विनम्रतेने या मागणीचा स्वीकार करत नारळ वाढवला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अश्विनी भिडे या मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यांनी आरे कार शेड साठी आग्रह धरला होता. तर आरे मध्ये  कारशेड वरून पेटलेल्या राजकारणामध्ये  अश्विनी भिडे यांची मेट्रो-3 च्या संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.सध्या अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त ठाकरे सरकारचा नवा प्रयोग; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रासह फुल देऊन मंत्रालयातील महिलांचे स्वागत.

मुंबई महानगरपालिकेसाठी कोस्टल रोड प्रोजेक्ट हा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी त्याकडे बघितलं जात आहे. काल मुंबईच्या प्रियदर्शनी पार्क भागामध्ये या कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ करण्यात आला. मावळा असं नाव असलेल्या टनेल बोरिंग मशिनचं नाव आहे. दरम्यान हा कोस्टल रोड ऑगस्ट 2023 पर्यंत मुंबईकरांसाठी खुला करण्याचा बीएमसीचा मानस आहे.