हनिमूनसाठी या ब्रिटीश जोडप्याने भारतात बुक केली अख्खी ट्रेन

या युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीतील खास ठिकाणाला दिली भेट

उटी : हनिमून हा लग्नानंतर एकांतात घालवण्याचे खास क्षण असतात. भारतीयांना परदेशात हनिमूनला जाण्याचे वेध लागतात. तसेच एका ब्रिटीश जोडप्याला दक्षिण भारताच्या निसर्ग सौंदर्याची भूरळ पडली. विविधतेने नटलेल्या भारतामध्ये राहणीमानात, खाद्यसंकृतीमध्ये जशी विविधता आहे तसेच आपण निसर्गसौंदर्यानेही संपन्न आहोत. अनेक परदेशी पाहुणे भारतातील प्राचीन काळापासून जपलेली अनेक अद्भूत पर्यटन स्थळ पाहण्यासाठी भारतात येतात.

ब्रिटीश जोडप्याला भारतीय निसर्गसौंदर्याची भूरळ

ग्राहॅम विलियम आणि सिल्विया प्लासिस या ब्रिटीश जोडप्याचं नुकतच लग्न झालं आहे. त्यांनी हनिमूनसाठी निलगिरी हे तामिळनाडूतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ निवडलं. निलगिरी पर्वतरांगांचं सौंदर्य एकांतामध्ये न्याहाळता यावं म्हणून त्यांनी 'निलगिरी माऊंटन' ही अख्खी ट्रेनच बुक केली होती.

असा प्रवास करणारं पहिलं जोडपं

निलगिरी माऊंटन रेल्वेची विशेष चार्टर्ड सेवा सुरू करण्यात आली. या ट्रेनने प्रवास करणारी ही पहिली जोडी आहे. आयआरसीटीसीद्वारा त्यांनी ही ट्रेन बुक करण्यासाठी सुमारे 2.50 लाख रूपये खर्च केले आहेत. यादरम्यान त्यांनी मेट्टपालयम ते ऊटी हा 48 किमीचा प्रवास केला.

43 प्रवासी क्षमता असलेल्या या खास ट्रेनमध्ये केवळ ग्राहॅम,सिल्विया आणि चालक होता. सुमारे 5 ते साडे पाच तासाच्या या प्रवासात ट्रेनमधून 13 बोगदे आणि जंगला काही भाग पार करत ट्रेन पुढे जाते. निलगिरी माऊंटन रेल्वेचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश आहे.  कुन्नुर रेल्वे स्टेशन आणि उटीमध्ये रेल्वे अधिकार्‍यांनी या जोडप्याचं स्वागत केले.